हलगर्जीपणातून दोघांचा बळी घेणारे ठेकेदार अद्यापही पसारच! पोलिसांकडून एकाला मात्र अटक; दोघांकडून अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणतीही खबरदारी न घेता आडहत्यारी ठेकेदाराच्या माध्यमातून तुंबलेल्या भूमिगत गटारात तिघांना उतरवल्याने विषयी वायूचा धक्का बसून गेल्या गुरुवारी (ता.10) शहरातील दोघांचा बळी गेला होता. या घटनेत संबंधित ठेकेदाराने अनेक महिने बंद असलेल्या गटारात विषारी वायू साठलेला असतानाही कोणतीही विशेष काळजी न घेता एकाला खाली उतरवले. मात्र बराचवेळ त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्याच्या मदतीला अन्य दोघे खाली उतरले. त्या दोघांनाही भोवळ आल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एकाचा जागीच तर, दुसर्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात मोठा संताप निर्माण झाल्याने पालिकेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुख्य दोघा ठेकेदारांसह गटारीचे काम करणार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर तिघेही पसार झाले होते. त्यातील मुश्ताक बशीर शेख मात्र पोलिसांच्या हाती लागला असून सध्या पोलीस कोठडीत आहे. तर, रामहरी कातोरेसह त्यांचा मुलगा मात्र अटकपूर्व जामीनासाठी जोरदार प्रयत्न करीत असून सध्या ‘स्वीच ऑफ’ आहेत.

संपूर्ण शहराला हादरवणारी ही धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.10) दुपारी चारच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावर घडली होती. शहरातील विविध भागात गेल्या चार वर्षांपासून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातंर्गत भूमिगत गटारांचे काम सुरु आहे. त्यामुळे ठेकेदाराशी केलेल्या करारानुसार गेल्या 2021 पासून शहरातील सर्व गटारांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मेसर्स आर.एम.कातोरे आणि कंपनी बघत आहे. तर शहरातील मोठ्या व भूमिगत गटारांच्या साफसफाईचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मेसर्स बी.आर.क्लिनिंग या कंपनीमार्फत मुश्ताक बशीर शेख या ठेकेदाराला पारंपरिक पद्धतीने देण्यात आले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्याच्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पालिकेने त्याला कराराचे नूतनीकरण करुन एका वर्षाची मुदतवाढ दिली होती जी 6 ऑगस्टपर्यंत आहे.

गेल्या गुरुवारी दुपारी या भागातील काहींच्या गटारी तुंबल्याने मुख्य गटारीचे चेंबर खोलून साफसफाई ठेकेदार मुश्ताक बशीर शेख याने काम सुरु
केले, त्यासाठी त्याने तीन मजूरही लावले. धक्कादायक म्हणजे या गटाराचे काम करताना संबंधित तक्रारदाराने पालिकेऐवजी ठेकेदाराकडे तक्रार केली आणि ठेकेदारानेही पालिकेला न विचारताच परस्पर कामही सुरु केले. यावेळी संबंधित ठेकेदाराने अतुल रतन पवार (वय 19, रा.संजय गांधीनगर) या तरुणाला रबरी हातमौजे, गमबूट, मास्क, गॉगल, टोपी, अॅप्रन न घालता तसेच, गटार साफ करण्यासाठी वापरले जाणारे सक्शन मशिन याचा वापर करण्याची आवश्यकता होती. मात्र मजुराच्या जीविताकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत त्याने त्याला गटारात उतरवले. त्यानंतर काही क्षणातच गटारातील अतिशय विषारी वायुने गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला.

खाली उतरवलेला मजुर बराचवेळ प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ठेकेदारासह इतरांनी गटारात डोकावून पाहीले असता सदरील तरुण
बेशुद्धावस्थेत तेथेच पडल्याचे दिसले. त्यामुळे रियाज जावेद पिंजारी (वय 21, रा.मदिनानगर) याच्यासह अन्य एकजण त्याच्या मदतीला खाली उतरले. तो पर्यंत सदरचा प्रकार पालिकेलाही समजल्याने अग्निशमन बंबासह मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, शिरीष तिवारी, आरोग्य निरीक्षक अमजद पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध झालेल्या पवारला वाचवण्यासाठी उतरलेल्या दोघांनाही विषारी वायुमुळे भोवळ येवून ते देखील गटारात कोसळले. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांनाही बाहेर काढले, मात्र तत्पूर्वीच पवारचा मृत्यू झाला होता तर पिंजारीला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील तिसरा मजुर मात्र बालंबाल बचावला.

आडहत्यारी ठेकेदाराच्या हलगर्जीपणातून घडलेल्या या घटनेनंतर शहरात मोठा क्षोभ निर्माण झाल्याने अखेर शुक्रवारी (ता.11) पहाटे
हलगर्जीपणा करणारे मुख्य ठेकेदार रामहरी मोहन कातोरे व त्यांच्या मुलगा निखिल याच्यासह साफसफाई ठेकेदार मुश्ताक बशीर शेख अशा तिघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तिघेही पसार झाले. त्यातील मुश्ताक शेख याला मात्र पोलिसांनी सोमवारी (ता.14) रात्री अटक करुन मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. तर, कातोरे पिता-पूत्र मात्र ‘स्वीच ऑफ’ होवून जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही समोर आले आहे.

या घटनेत गुन्हा दाखल झालेल्या कातोरे पिता-पुत्रासह मुश्ताक शेख हा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. या घटनेनंतर त्यांच्यासोबतचे विविध कार्यक्रमातील फोटो व्हायरल करुन विरोधकांनी ही बाबही समोर आणली होती. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय किनार लागली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांकडून त्याचा किती खुबीने वापर होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

