शिवभोजन थाळी बनली सर्वसामान्य जीवांचा आधार.. नेवाशात रोज 180 गरजूंना थाळीचे मोफत वाटप…

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरामध्ये सुरू असलेली शिवभोजन थाळी कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य जीवांची मोठी आधार बनलेली दिसत आहे. दररोज सुमारे 180 गरजूंना मोफत वाटप करण्यात येत असल्याचे चालक गोरख घुले व विलास गरुड यांनी सांगितले.

याबाबत बोलताना शिवभोजन थाळी सेंटरचे चालक तथा शिवसेनेचे युवा कार्यकर्ते गोरख घुले म्हणाले, गोरगरीब माणूस लॉकडाऊनच्या काळात उपाशीपोटी राहू नये म्हणून मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरात शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या थाळीची किंमत अगोदर दहा रुपये होती; मात्र कोरोनाच्या संकटात ती पाच रुपये करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर हीच थाळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मोफत वाटप करत असून शासनाच्या दीडशे थाळी बरोबरच आम्ही देखील पंचवीस ते तीस थाळी देतो. त्यामुळे आमच्या शिवभोजन थाळी सेंटरमध्ये सुमारे 180 जणांना मोफत वाटप केले जात आहे.

चालक विलास गरुड म्हणाले की, दररोज ताजा भाजीपाला आणून दर्जेदार शिवभोजन थाळी देत आहोत. लाभार्थ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली असून सामाजिक अंतराचे पालन करत ही थाळी पार्सलच्या रूपाने देण्याचा प्रयत्न करत आहोत. या मोफत शिवभोजन थाळी उपक्रमाचा शुभारंभ माजी उपसरपंच गोरख घुले, पत्रकार सुधीर चव्हाण, माजी शहरप्रमुख अंबादास लष्करे, सुनील धायजे, पप्पू पवार, अपंग संघटनेचे अध्यक्ष अमित जेधे, सुनील पाटील, नामदार गडाख यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव, अन्सार शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Visits: 3 Today: 1 Total: 30170

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *