दोन दिवसांत अवैध धंद्यांसह सर्व अतिक्रमणं हटवा! हिंदुत्त्ववादी संघटनांचा इशारा; अन्यथा पुन्हा हिंदू ‘जनआक्रोश’..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी कोल्हेवाडी रस्त्यावर घडलेल्या झुंडगिरीच्या विरोधात संगमनेरातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज दुपारी शासकीय विश्रामगृहावर विविध हिंदुत्त्ववादी संघटनांची बैठकही बोलावण्यात आली होती. यावेळी उपस्थित शेकडों कार्यकर्त्यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करीत या घटनेमागे शहरात बोकाळलेले अवैध व्यवसाय, बेसुमार अतिक्रमणं, परवाना नसलेल्या रिक्षा आणि बेकायदा वास्तव्य करणारी माणसं असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्वांवर दोन दिवसांत प्रशासनाने कारवाई न केल्यास संगमनेरात पुन्हा हिंदु जनआक्रोश मोर्चा काढला जाईल, त्यानंतर होणार्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल असा थेट इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात शांतता असली तरीही तणाव कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

मंगळवारी (ता.12) सायंकाळी साडेसहा वाजता कत्तलखान्यांचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हेवाडी रस्त्यावर सदरचा प्रकार घडला होता. किरकोळ कारणावरुन एका तरुणाला त्याच्या दोन लहानशा मुलींसमोरच निर्दयी जमावाने बेदम मारहाण केल्याने संगमनेर शहरात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचे पडसाद मंगळवारी रात्रीपासूनच उमटू लागले असून संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांकडून एका समुदायाची ही दंडेलशाही मोडून काढण्याची मागणी होवू लागली आहे. त्यामुळे निवडणुकांसोबतच आता संगमनेरातील जातीय तणावही तापत असल्याचे चित्र दिसत आहे.

या घटनेच्या अनुषंगाने संगमनेरातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी आज दुपारी शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शहर
व ग्रामीणभागातील शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी यांनी शहरात बोकाळलेल्या अतिक्रमणांसह मोठ्या प्रमाणात सुरु असलेले गोवंश कत्तलखाने आणि त्यातून मिळणारा अमाप पैसा कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यासोबतच कोल्हेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा मानवी वस्ती उभी राहीली असून तेथे राहणारी माणसं कोठून आली आहेत? याचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. लहान लेकरांसमोरच त्यांच्या पित्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार सैतानच करु शकतात, त्यामुळे अशा लोकांना कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू समाज शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक कुलदीप ठाकूर यांनीही या घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवताना प्रशासनासमोर चार मुद्दे उपस्थित केले आहेत. कोल्हेवाडी रस्त्यावरील बेसुमार अतिक्रमणांतूनच हा प्रकार घडल्याचे त्यांचे मत असून ज्याप्रमाणे जोर्वेनाक्यावरील अतिक्रमणं भूईसपाट केली त्याप्रमाणे कोल्हेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणंही तत्काळ हटवावी, या भागात दिवसाढवळ्या गोवंशाची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु असते, त्यातून मिळणार्या पैशांवरच अशाप्रकरची गुंडगिरी पोसली जात असल्याने शहरातील सर्व बेकायदा कत्तलखाने उध्वस्थ करावेत,

‘लँड जिहाद’ व ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही संगमनेरातून समोर येत असून पोलिसांनी वेळीच त्याचे गांभीर्य ओळखून त्याला पायबंद घालावा, त्यासोबतच संगमनेरात भंगारातील रिक्षांचा प्रवाशी वाहतुकीसाठी आणि बेकायदा उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने अशाप्रकारच्या सर्व रिक्षांच्या परवान्याची तपासणी करुन त्या जप्त कराव्यात अशी मागणी केली आहे. दोन दिवसांत या मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटना ‘जनआक्रोश’ करतील, त्यानंतर निर्माण होणार्या परिस्थितीला पोलीस प्रशासनच जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या जमलेल्या मोठ्या जमावाने मंगळवारच्या घटनेबाबत संताप व्यक्त करताना दोषींना तत्काळ कारागृहात टाकण्यासह कोल्हेवाडी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे त्वरीत हटवण्याची जोरदार मागणी केली. यावेळी उपस्थित तरुणांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आजच्या बैठकीला शहरासह ग्रामीणभागातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कोल्हेवाडी रस्त्यावरील घटनेचे पडसाद ग्रामीणभागात पोहोचू नये यासाठी पोलिसांनी ठोस कारवाई करावी लागणार आहे.

