राहुरी पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला; तीन पोलीस जखमी
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील एकलव्य वसाहतीमध्ये सात महिन्यांपूर्वी गावठी पिस्तुलातून गोळीबाराच्या घटनेत एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेल्या दोन गटांतील वाद पुन्हा उफाळला. राहुरी पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी (ता.27) दुपारी एक वाजता दोन्ही गटात तुंबळ मारामार्या झाल्या. त्या सोडविणार्या तीन पोलिसांना धक्काबुक्की झाल्याने ते दुखापतग्रस्त झाले.
याप्रकरणी दोन्ही गटाच्या तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नारायण भरत माळी, कांताबाई संजय माळी, प्रतिभा गोरख बर्डे, सोनाली करण माळी, आशा गुलाब बर्डे, पूजा विष्णू गोलवड, मयुरी गोरख बर्डे, काजल शंकर बर्डे, अंकुश नामदेव पवार, दत्तू राजू माळी, विमल नामदेव पवार (सर्वजण रा. एकलव्य वसाहत, राहुरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय उर्फ बन्नी गोरख बर्डे, राकेश उर्फ जाकी संजय माळी (दोघेही रा. एकलव्य वसाहत, राहुरी) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
राहुरी शहरात 18 फेब्रुवारी 2022 रोजी एकलव्य वसाहतीमध्ये अंकुश पवार याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यात, सोनाली बर्डे-माळी यांचा हाताच्या कोपराखाली गोळी घुसली होती. त्यानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गोळीबार केलेल्या पवार गटाच्या सहा जणांविरुद्ध आर्म अॅक्टसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. नंतर पवार गटातर्फे बर्डे-माळी गटाच्या दहा जणांविरुद्ध दमदाटी, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
दोन्ही गटातील आरोपी सध्या जामिनावर सुटलेले आहेत. तेव्हापासून दोन्ही गटात पुन्हा धुसफूस चालू होती. त्यांचा वाद मंगळवारी पुन्हा उफाळला. दोन्ही गट राहुरी पोलीस ठाण्यासमोर आमने-सामने भिडले. त्यांचा वादविवाद सोडविताना पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, सुचित्रा सूर्यवंशी व कुसळकर या तिघांना धक्काबुक्की झाली. त्यात तिन्ही पोलीस दुखापतग्रस्त झाले. शासकीय कर्तव्यास अटकाव करून पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे राहुरी शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण राहिले. याप्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.