लाचखोरांनी घेतले संगमनेर व अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांचे बळी! संबंध नसतांना झालेल्या कारवाईला नागरिकांचा होऊ लागलाय मोठा विरोध..


नायक वृत्तसेवा, संगमनेर/अकोले
संगमनेर व अकोले पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचार्‍यांनी आपली पैशांची लालसा भागवण्यासाठी वरीष्ठ अधिकारांनी तंबी देवूनही माती खाल्ली आणि त्याचा परिणाम तंबी देणार्‍यांनाच भोगावा लागल्याचा जगावेगळा प्रकार आज समोर आला आहे. विशेष म्हणजे लाचखोरीच्या या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्ही ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांचा दुरान्वये संबंध आढळून आला नाही. मात्र वरीष्ठ अधिकार्‍यांनी शिस्तीचा बडगा उगारीत कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संगमनेर पोलीस ठाण्यात अवघ्या महिनाभरापूर्वीच रुजू झालेल्या मुकुंद देशमुख यांनी डोळ्यात भरावे असे काम केले होते, मात्र एका कर्मचार्‍याच्या कृत्याने त्याचा मोबदला म्हणून त्यांना बक्षिसी म्हणून चक्क बदलीचा सामना करावा लागला. तर अकोल्यातील कधीही बंद न होणारे अवैध व्यवसाय कडेकोट बंद करण्याची किमया तेथील निरीक्षक अभय परमार यांनी साधली होती, मात्र त्यांच्या ठाण्यातील कर्मचार्‍यानेच त्यांच्या कर्तृत्त्वाला खिळ घातली. या तडकाफडकी कारवाईमुळे आता सामान्य माणूसही बोलू लागला असून पोलीस अधीक्षकांनी दोन्ही अधिकार्‍यांवर केलेल्या कारवाईचा पुनर्विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


महिन्याभरापूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारणार्‍या पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी मोठ्या कालावधीपासून ‘मलिन’ असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याची प्रतिमा उंचावण्याचा चंग बांधूनच कामकाज सुरु केले. त्याची पहिलीच झलक शहर पोलीस ठाण्याची इमारत आणि आवारातून दिसून आली. केवळ इमारतीची स्वच्छता, टापटीपपणा म्हणजे चांगले काम नव्हे, हे देखील त्यांना चांगले ज्ञात असल्याने त्यांनी या इमारतीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही अगदी पहिल्या दिवसापासूनच शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचार्‍याला ‘ड्युटी’ कशाला म्हणतात याचा प्रत्यय येण्यात झाली.


दररोज सकाळी बरोबर 9 वाजता सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी गणवेशातच कर्तव्यावर हजर व्हावे असा दंडकच पो.नि.देशमुख यांनी रुजविला होता. त्यासोबतच सरकारी वाहन अधिकार्‍यांना फिरण्यासाठी अथवा पोलीस ठाण्याच्या आवारात शोभेची वस्तु म्हणून उभे करण्यासाठी नसून सामान्यांना संकटापासून वाचण्यासह संकटाची जाणीव करुन देण्यासाठीही असते याची पहिल्यांदाच त्यांनी जाणीव करुन दिली. त्यामुळे अगदी दिवाळीपासून शहर पोलीस ठाण्याचे सरकारी वाहन शहरातील गल्लीबोळात फिरुन मुखपट्टी (मास्क) वापरण्याचे आवाहन करीत होते, त्यासोबतच भररस्त्यात वाहने उभी करणार्‍यांवर कारवाई देखील केली जात होती.


पूर्वी घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर होत. पो.नि.देशमुख यांनी मात्र अगदी सुरुवातीपासूनच चौका-चौकात बंदोबस्त तैनात करण्याचा पायंडा पाडल्याने शहरात घटना घडणेच बंद झाल्याचे चित्र होते. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्त्व दिसू लागल्याने शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा बसण्यासोबतच नागरिक व वाहनधारकांनाही शिस्तीचे धडे मिळत होते. अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांनी पाय पसरलेल्या संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने म्हणजे राज्याला गोवंशाचे मांस पोहोचवण्याचे आगारच ठरले होते. मात्र पो.नि.देशमुख यांनी पदभार घेतल्यापासून आजवर सदरचे कत्तलखाने कडेकाट बंद आहेत हा त्याच्याच परिपाक म्हणाला लागेल.


पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणारी व्यक्ति आदरणीय आहे. त्यांच्याशी सन्मानाने बोलावे, परस्पर तडजोडी करणार्‍यांची गय होणार नाही अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी ठाणे अंमलदारांना दिल्या होत्या. ते स्वतः भाऊबंदकीचे वाद सामोपचाराने मिटवण्याचा व तक्रारदारांच्या घरातील सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत. परस्पर विरोधी तक्रारींमध्येही दोन्ही बाजूच्या तक्रारी ऐकूनच कारवाईचा निर्णय घेत. याशिवाय शहरात कोठेही कोणताही प्रकार घडल्यास व त्याबाबतची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटांत पोलिसांनी वाहनासह तेथे पोहोचावे अशा पद्धतीने त्यांनी कामकाजाची पद्धत रुजविण्यास सुरुवात केली होती. मोठ्या कालावधीनंतर शहरात काहीतरी चांगले घडत आहे असे चित्र दिसत असतांना एका लाचखोर कर्मचार्‍याच्या लालसेने या कर्तृत्त्ववान अधिकार्‍यावर बालंट आणले आणि त्यांना नाहक बदलीचा सामना करावा लागला.


अकोले पोलीस ठाण्यात घडलेला प्रकारही यापेक्षा वेगळा नाही. एकतर अकोले पोलीस ठाणे मिळवण्यात कोणत्याही पोलीस निरीक्षकाला रस नसतो. त्यात पो.नि.अभय परमार यांनी तेथील पदभार स्विकारला असता तेथील गुन्हेगारी प्रवृत्ती, अवैध व्यवसायांचे जाळे आणि गुन्ह्यांचा वाढता स्तर नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या कालावधीनंतर अकोल्यातील सर्व अवैध धंद्यांना अक्षरशः टाळे लावण्यास भाग पाडले होते. संगमनेरात त्यांनी बजावलेल्या भूमिका अकोल्यातही ऐकल्या जात असल्याने त्यांनी पदभार घेण्यापूर्वीच तेथील अवैध व्यावसायिकांना धडकी भरली होती. ती भिती कायम ठेवून त्यांनी अकोल्यातील वातावरण गुन्हेगारी मुक्त करण्याचा चंग बांधून त्या दिशेने कारवाई सुरु केली असतांना एका कर्मचार्‍याच्या लाचखोरीने त्यांचाही बळी घेतला. या दोन्ही अधिकार्‍यांनी सामान्य नागरिकांला समाधान मिळेल असे काम केल्याने त्यांच्या कारवाईला विरोध होवू लागला आहे. पोलीस अधीक्षक जनभावनेचा विचार करुन काय निर्णय घेतात याकडे आता जिल्ह्यातील पोलीस दलाचे लक्ष्य खिळले आहे.

एखाद्या संस्कारित कुटुंबातील एखादा सदस्य वाममार्गाला लागला तर त्याचा दोष कोणीही त्या कुटुंबाला देत नाही. मात्र आज झालेल्या या कारवाईने ही धारणाच बदलून टाकली आहे. लोकाभिमुख काम करुन, सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांची प्रतिमा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करुनही एखाद्या कर्मचार्‍याच्या कृत्यामुळे वरीष्ठ अधिकार्‍यांना जर अशा प्रकारच्या कारवाईचा सामना करावा लागणार असेल तर चांगले काम करण्यास कोण धजावेल? असा सूर आता संगमनेर व अकोल्यातील सामान्य नागरिकांच्या मुखातून उमटत आहे. पोलीस अधीक्षकांनी कोणताही दोष नसलेल्या या दोन्ही अधिकार्‍यांवरील कारवाईचा पुनर्विचार करावा अशी अपेक्षा सामान्यजन करीत आहेत.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून तेथील अवैध धंदे, बेकायदा कत्तलखाने व अन्य बेकायदेशीर कृत्यांना मोठा चाप बसला होता. पोलीस ठाण्यात काम घेवून येणारा प्रत्येक नागरिक समाधानी होवूनच गेला पाहिजे असा दंडकही त्यांनी निर्माण केला होता. अवघ्या महिन्याभरातच संगमनेरात त्यांनी कायद्याचे स्थान अधिक बळकट करुन सामान्यांच्या मनात पोलिसांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या तडकाफडकी बदलीच्या वृत्ताने चांगल्या कामाला खिळ बसली आहे हे मान्य करावे लागेल.
बाळासाहेब नवगिरे
जिल्हाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *