धांदरफळच्या तलाठ्याला लागलाय डान्सबारचा नाद! वाळु तस्करांना थेट ‘ऑफर’; महसूलमंत्र्यांच्या राज्यात चाललंय तरी काय?..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सर्वच नद्यांच्या पात्रातून बेकायदा वाळु तस्करी आता नियमित झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री वाळु तस्करी बंद असल्याच्या घोषणा करीत असले तरीही प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. हे स्पष्ट करणारी घटनाच आता समोर आली असून धांदरफळचा कामगार तलाठी नदीपात्र आपल्याच बापाचे समजून भरमसाठ लुट करीत असल्याचे एका वाळु तस्कराच्या तक्रारीतून उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे याच तस्कराला गेल्या महिनाभर बेकायदा वाळु वाहतुकीची परवानगीही देण्यात आली होती. मात्र सोमवारी त्याच्यावरच कारवाई करीत संबंधित तलाठ्याने वरीष्ठांकडून आपली पाठही थोपटून घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या ‘त्या’ वाळु तस्कराने धांदरफळच्या तलाठ्याविरोधात तक्रारअर्ज दिला असून त्यातून ‘बाई’ आणि ‘बाटली’त गुरफटलेल्या ‘मनमौजी’ तलाठ्याची गुपितंही उघड झाली आहेत. संबंधित तलाठी त्याच तस्करासोबत बसून बिअरबारमध्ये मद्यही रिचवित असल्याचा आणि सोबत मासिक हप्त्यापोटी दहा हजारांची रोकड घेत असल्याचा व्हिडिओही तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकाराने महसूल विभागाची लक्तरं वेशीवर आली असून महसूलमंत्री त्याकडे किती गांभीर्याने पाहतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


सोमवारी महसूलच्या पथकाने धांदरफळ शिवारातून बेकायदा वाळुचोरी करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडून थेट संगमनेर तालुका  पोलिसांच्या हवाली केला. याबाबत संबंधित तलाठ्याने काही माध्यमांना माहिती देताना आपण कसे ग्रेट आहोत याचा बढायाही मारल्या. वाळु तस्कराला आपल्या येण्याची कुणकुण लागताच तो सैराट झाला, मात्र आपण त्याचा दहा ते बारा किलोमीटर पाठलाग करुन अखेर त्याचा ट्रॅक्टर पकडलाच अशी माहितीही त्याने काही पत्रकारांना दिली. विशेष म्हणजे संबंधिताने उभी पिकं तुडवित पळून जाण्याच्या तयारीतील ट्रॅक्टर पकडल्यानंतर त्याच्या पुढ्यात उभे राहुन छायाचित्रही घेतले आणि तेच छायाचित्र माध्यमांनाही पुरविले. या तलाठ्याचा कर्तव्यदक्षपणा पाहून स्थानिक महसूल अधिकार्‍यांना गर्वही वाटला असेल, मात्र तो फारकाळ टिकू शकला नाही.


सोमवारी (ता.11) धांदरफळ येथील वाळु तस्कर सागर तुकाराम कोकणे याने तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात त्याने संबंधित कामगार तलाठ्याने स्वतःहून वाळु तस्करी करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप केला असून रविवारी (ता.10) रात्री त्याने आपल्या जवळच्या मित्राला फुकट वाळु देण्यास व रात्रभर नदीपात्रातून वाळु वाहतूक करण्यासाठी महिन्याला 20 हजार रुपये देण्यास सांगितल्याचे म्हंटले आहे. तसे न केल्यास तुझा ट्रॅक्टर धरुन नेईल व खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकीही त्याने दिली. यावेळी ‘त्या’ तलाठ्याने ‘मला मुंबईला डान्सबारमध्ये घेवून जायचं आणि तेथील सगळा खर्च करायचा’ अशी अटही घातली. या गोष्टी पूर्ण न केल्यास त्या वाळु तस्करावर वाळुचोरी अथवा सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचेही सागर कोकणे याने आपल्या तक्रार अर्जातून सांगितले आहे.


विशेष म्हणजे संबंधित कामगार तलाठ्याने गेल्या महिन्यातच सागर कोकणे याला धांदरफळ मधून वाळु चोरी करण्यास प्रोत्साह दिले होते व त्यापोटी त्याच्या मित्राला फुकट वाळुचा पुरवठा करवून घेत 20 हजारांची रक्कमही खिशात घातली होती. त्याशिवाय महसूलच्या भरारी पथकाला देण्यासाठीचे तीन हजार रुपयेही त्याने घेतले होते अशी माहिती मिळाली आहे. त्या उपरांतही त्याने परस्पर ट्रॅक्टर पकडून तो दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्याऐवजी थेट चोरीचा गुन्हा दाखल करीत तालुका पोलीस ठाण्यात नेवून उभा केल्याचेही संबंधित वाळु तस्कराने सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे सोमवारी ज्या तस्कराचा ट्रॅक्टर पकडण्यात आला त्याच्या सोबतच कासारवाडी शिवारातील एका बिअरबारमध्ये बसून ‘तो’ तलाठी खुलेआम वाळु चोरीला प्रोत्साहन देत असल्याचे, त्यापोटी सागर कोकणे याच्याकडून 10 हजारांचा पहिला हप्ता आणि सोबत 670 रुपयांची दारु रिचवल्याचा व्हिडिओही समाज माध्यमांमध्ये तुफान व्हायरल झाला आहे. त्यातून महसूल विभागाची लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत.


संबंधित वाळु तस्कराकडून मिळणार्‍या मलिद्यामध्ये तालुका पोलिसांचाही ‘हात’ असल्याची चर्चा असून त्यांनाही महिन्याकाठी 10 हजारांचा लाभ होत असल्याचे बोलले जाते. त्या वाळु तस्कराला तलाठ्याच्या विरोधात तक्रार अर्ज देण्याची शक्कलही तालुका पोलीस ठाण्यातील एका अधिकार्‍यानेच दिल्याची चर्चा असून अर्ज दाखल होताच त्याची माहिती स्थानिक महसूलच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना देण्याची आणि तत्काळ ‘त्या’ तलाठ्याला पोलीस ठाण्यात पाचारण केल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. त्यावरुन संगमनेर तालुका पोलिस ‘आंबेही खात असल्याचे आणि त्याच्या कोयाही विकत असल्याचे’ही उघड झाले आहे. सदरील तलाठ्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी आहेत, मात्र त्याच्या डोक्यावर वरीष्ठांचा हात असल्याने आजवर त्याचे काहीच वाकडे झालेले नाही. त्यातूनच बिअरबारसारख्या ठिकाणी बसून तो उघड पैसेही घेतो, दारुही रिचवतो आणि डान्सबारची ऑफरही देत असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या गोष्टींनी संगमनेरच्या महसूल विभागाची आब्रु वेशीवर आली असून त्या तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात ‘आदर्श वाळु धोरण’ लागू केल्यानंतर जिल्ह्यातील वाळु तस्करी कडेकोट बंद असल्याचे दावे वेळोवेळी केले आहेत. मात्र धांदरफळच्या घटनेने त्यांचे सगळे दावे साफ खोटे असल्याचे दाखवून दिले असून गेली अनेक वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काही तलाठ्यांनी नद्यांचे पात्र म्हणजे आपल्या बापाचीच मालमत्ता समजून त्यातून भरमसाठ गौण खनिजाची लुट चालवल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खुद्द महसूलमंत्र्यांनाच खोटे पाडणार्‍या या तलाठ्यावर आता नेमकी काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Visits: 179 Today: 1 Total: 1580622

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *