शिर्डीमध्ये अग्नितांडव; यूनियन बँक व एटीएम थोडक्यात बचावले! लाखो रुपयांचे नुकसान; परिसरातील रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नगर-मनमाड महामार्गालगत असणार्‍या प्लास्टिक मटेरियल दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शिर्डी येथे घडली आहे. शुक्रवारी (ता.10) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान शिर्डीत ही घटना घडली असून बाजूला असलेली यूनियन बँक व एटीएम सेंटर थोडक्यात बचावले आहे.

शिर्डी येथे नगर-मनमाड रस्त्याच्या लगत यूनियन बँकेच्या शेजारी चांगदेव कसबे यांचे ओम साई ट्रेडर्स नावाने दुकान असून प्लास्टिक मटेरियलसह हॉटेल मटेरियल आणि लग्न समारंभासाठी लागणार्‍या विविध वस्तूंची होलसेल दरात विक्री केली जाते. कसबे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अचानक या दुकानाला आग लागली. दुकानात प्लास्टिक मटेरियलसह विक्रीसाठी ठेवलेले सीडचे कॅन असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातून स्फोट झाल्यासारखे आवाज येऊ लागल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या दुकानाच्या बाजूलाच यूनियन बँकेचे एटीएम मशीन व इमारतीत यूनियन बँकेची शाखा तसेच हॉटेल्स आणि रहिवासी परिसर असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान तसेच राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र ओम साई ट्रेडर्स या दुकानासह त्यांचे गोडावून आगीत भस्मसात झाल्याने सुमारे 12 ते 13 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालक चांगदेव कसबे यांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

शिर्डीत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, लॉजिंग, रहिवासी इमारती तसेच विविध बँका आहेत. मात्र अनेकजण फायर सेफ्टी ऑडिटच्या बाबतीत दुर्लक्ष करत असून अनेकांचे ऑडिट झाले नसल्याने ही बाब मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते. शिर्डीत मोठ्या संख्येने साई भक्त येत असतात. स्थानिक राहिवाशांसह साई भक्तांची सुरक्षा देखील महत्वाची आहे. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने फायर सेफ्टीसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 117561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *