अवकाळीचा कहर; भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान तत्काळ पंचनामे करण्याची आदिवासी शेतकर्यांची मागणी

नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील भंडारदरा परीसरात व पाणलोटात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसल्याने आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे तत्काळ पंचनामे करावी अशी मागणी आदिवासी शेतकर्यांतून जोर धरु लागली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात शुक्रवारी व शनिवारी अवकाळी पावसाने कहर केला असल्याने आदिवासी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला भातशेतीचा घासही हिसकावून नेला आहे. ऐन दिवाळीच्या सणातच नवीन संकट उभे राहिले आहे. अगोदर पावसाने केलेला उशीर, त्यामुळे भाताची लागवडही उशीरा उशीरा झाली. त्यानंतर जो पाऊस सुरु झाला तो लवकर उघडलाच नाही. परंतु पडत असलेला पाऊस चांगला असल्याने भातपीक जोमदार येईल असे वाटत असतानाच अचानक पाऊस गायब झाला आणि भातपिकावर एका विशिष्ट रोगाने घाला घातला. या रोगामध्ये अनेक आदिवासी बांधवांचे भातपिके भुईसपाट झाली. त्यावेळी ना कृषी खाते या बांधवांच्या मदतीला धावले ना महसूल खाते. या दोन्ही खात्यांनी साधे आदिवासी बांधवांच्या बांधावर येण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. तरीही या रोगातून काही शेतकर्यांची भातपिके जोमाने उभी राहिली होती.

दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट दिला गेला होता. पंरतु हवामान खात्याचा हा अंदाज भंडारदर्यातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचला गेला नाही. त्यामुळे काही शेतकर्यांनी भात कापून आपल्या शेतातच खळ्यावर आणून टाकला होता. दिवाळी झाल्यावर लेकीबाळींना वाटी लावल्यावर भात करायचा असा आराखडा या बांधवांचा कायमचा असल्याने याही वर्षी भात खळ्यावरच पडलेला होता. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने हा भात भिजल्याने वाया गेला आहे. तर शेतात उभे असणारे भातपिकही पावसाच्या टपोर्या थेंबांनी गळून गेले आहे. काही शेतांमध्ये पाणीच पाणी साचल्याने राहिलेले भातपिक कसे सोंगावे हा प्रश्न आदिवासी शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे तातडीने कृषी विभाग व महसूल खात्याने पंचनामे करावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
