मित्राच्या मदतीला धावलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला! लक्ष्मीनगरमधील घटना; अकरा जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील भांडणाच्या कारणावरुन उसळलेल्या वादात जमावाच्या तावडीत सापडलेल्या मित्राच्या मदतीसाठी धावलेल्या तरुणावर कोयता आणि दगडाने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. शहरालगतच्या लक्ष्मीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी यातील हुसैन बाबमियां शेख या जखमी तरुणाचा रुग्णालयात जावून जवाब नोंदविल्यानंतर शहरात वेगवेगळ्या भागात राहणार्‍या 11 जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाचजणांना आज पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली असून सहाजण पसार झाले आहेत. या घटनेने गुन्हेगारांचा वावर वाढत असलेला लक्ष्मीनगर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.12) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मीनगरमध्ये घडली. मालदाड रोडवरील तिरंगा चौकात राहणारा हुसैन बाबामियां शेख (वय 19) हा तरुण लक्ष्मीनगरमध्ये राहणारा त्याचा मित्र धिरज पावडे याला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी नीलेश काथे याच्याशी झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणांच्या जमावाने पावडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या मित्राला मारहाण होत असल्याचे पाहुन हुसैन शेख त्याच्या मदतीला धावला आणि मध्यस्थी करु लागला.


त्यामुळे तरुणांच्या जमावाने त्यालाही घोळक्यात घेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी गोट्या उर्फ प्रशांत घेगडमल याने त्याच्याकडील कोयत्याने शेखच्या उजव्या हातावर वार केला. तर, नीलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे व साहील देव्हारे या चौघांनी रस्त्यावरील दगड हातात घेवून दोनवेळा त्याच्या डोक्यात प्रहार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ झालेल्या त्या दोघांचा आकांत ऐकून आसपासचे नागरीक धावल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मारहाणीत हुसैन शेख याला गंभीर दुखापत झाली आहे.


याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णालयात जावून जखमी शेख याचा जवाब नोंदविला. त्यावरुन आरोपी गोट्या उर्फ प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, रा.कासारवाडी), प्रथमेश अशोक पावडे (वय 21, रा.नवीन नगररोड), सनी चंद्रशेखर तरटे (वय 31, रा.गोल्डनसिटी), अविनाश सोमनाथ मंडलिक (वय 29, रा.ढोलेवाडी), सौरभ राजेंद्र फटांगरे (वय 26, रा.इंदिरानगर गल्ली नं.7), नीलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे, साहील देव्हारे, ऋषि धिमते व अरबाज पठाण (सर्व रा.संगमनेर) अशा एकूण 11 तरुणांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 324, 323, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पहिल्या पाच आरोपींना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार असून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व हल्ला करण्यामागील हेतूचा तपास लावण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विश्‍वास भान्सी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्याकाही दिवसांत शहरालगतचा लक्ष्मीनगर परिसर वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असून या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावरही वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या परिसरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.


शुल्लक कारणावरुन तब्बल 11 तरुणांनी केलेला एकाचा जीव घेण्याचा प्रयत्न अतिशय धक्कादायक आहे. याप्रकरणी या सर्वांवर अतिशय गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील गोट्या उर्फ प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, रा.कासारवाडी), प्रथमेश अशोक पावडे (वय 21, रा.नवीन नगररोड), सनी चंद्रशेखर तरटे (वय 31, रा.गोल्डनसिटी), अविनाश सोमनाथ मंडलिक (वय 29, रा.ढोलेवाडी), सौरभ राजेंद्र फटांगरे (वय 26, रा.इंदिरानगर गल्ली नं.7) या पाच जणांना आज पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली आहे. तर, नीलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे, साहील देव्हारे, ऋषि धिमते व अरबाज पठाण हे सहाजण पसार झाले आहेत.

Visits: 100 Today: 1 Total: 1099073

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *