शिर्डीच्या जागेसाठी भाजप पदाधिकार्यांचा आग्रह! बबन घोलप यांचे नाव चर्चेत; विद्यमान खासदार मुंबईत तळ ठोकून..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले अंतर्गत सर्वे करुन त्याबाबतची चाचपणीही केली असून शिवसेनेच्या दोन्ही गटांबरोबरच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसह आता गेल्या दीड दशकापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाही पुढे सरसावली आहे. त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डीतून पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राज्याच्या जागावाटपात शिर्डी ‘हॉटस्पॉट’ बनली आहे. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करुन सध्या ‘स्टँडबाय’ मोडवर असलेल्या बबन घोलप यांना पक्षप्रवेश देवून भाजपाकडून उमेदवारी जाहीर होण्याचीही शक्यता कायम आहे. त्यामुळे धाबे दणाणलेले विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांची मातब्बर उमेदवार देण्याची कवायत सुरु असतांना दोन्ही बाजुच्या इच्छुकांची संख्या आणि निवडून येण्याच्या दाव्यांमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने याबाबत बैठकाही घेतल्या आहेत. त्यातून राज्यातील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला असला तरीही अजून काही जागांवर घटकपक्षांचे एकमत होवू शकलेले नाही. अशातच आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसनेही शिर्डी लोकसभेची जागा मिळावी यासाठी आग्रह सुरु केला आहे. दिवंगत नेते अॅड.प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या उत्कर्षा रुपवते शिर्डीसाठी आग्रही असून त्यांनी त्या दृष्टीने तयारीही सुरु केली आहे.
गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले जिल्ह्यात आले होते. यावेळीही त्यांनी शिर्डी, संगमनेर व अकोले अशा तिनही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमधून शिर्डीच्या जागेसाठी आपल्या नावाचा आग्रह पुढे केला आहे. हवेतर येथील उमेदवाराला आपल्या जागी राज्यसभेवर पाठवा, मात्र लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच द्या अशी मागणीही त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिर्डीच्या जागेवर दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला आहे. नैसर्गिक तत्त्वाने शिर्डीच्या जागेवर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि महायुतीतल्या शिंदे गटाचा हक्क आहे
यंदाच्या निवडणुकीत भाजपने आपल्या चिन्हावर 370 खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान 32 ते 35 जागा लढवण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे. अशा स्थितीत भाजपकडून दबावतंत्राचा वापर होवून मित्रपक्षाच्या इच्छुक दावेदारांना ‘कमळ’ चिन्ह घेवून लढण्याचाही पर्याय दिला जाणार असल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देवून महिना उलटूनही माजीमंत्री बबन घोलप यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. भाजपकडून शिर्डीसाठी करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेत विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबतची नाराजी समोर आल्याचे वृत्त असून बबन घोलप यांच्या नावाला बहुतेकांनी पसंदी दिल्याचे समजते. त्यामुळे स्टँडबाय स्थितीत असलेल्या घोलप यांना थेट भाजपमध्ये पक्षप्रवेश देवून त्यांना शिर्डी लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याचीही दाट शक्यता आहे.
नगर दक्षिणेतील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील पुढच्या पंचवार्षिकसाठी शिर्डीत परतण्याचीही शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत घोलप यांना उमेदवारी देवून पुढीलवेळी वयाच्या कारणास्तव त्यांचे तिकिट कापले जावून पक्षाने सिंचन केलेला मतदार संघ मिळवण्याची त्यामागील योजना असल्याचे बोलले जाते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीच्या जागेसाठी धरलेला आग्रह हे सांगण्यास पुरेसा आहे. यासर्व गोष्टींचा अंदाज आल्याने नेहमीप्रमाणे निवडणुकीपूर्वी काही महिने आधी मतदार संघात येवून निधीची बरसात करणार्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे धाबे दणाणले असून राज्यातील जागा वाटपाचे सूत्र जाहीर होण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी मुंबईत तळ ठोकला आहे.
सद्यस्थितीत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदार संघ 2029 साली सर्वसाधारण वर्गासाठी खुला होणार आहे. तत्पूर्वीच तो आपल्या ताब्यात असावा यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांसह भाजप आणि काँग्रेसने जोरदार मागणी लावून धरली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या जवळ जात असलेल्या वंचित बहुजन आघाडीसह भाजपसोबत असलेल्या आर.पी.आयने (आठवले गट) या जागेची मागणी केल्याने आणि त्यासाठी राज्यसभा सोडण्याचीही तयारी दाखवली गेल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या जागावाटपात ‘शिर्डी’ची जागा ‘हॉटस्पॉट’ बनली आहे. महायुतीकडून शिर्डीचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे शिर्डीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असून मतदारांची उत्कंठा वाढली आहे.