महिना अखेरीस राज्यासह जिल्ह्यात राजकीय भूकंप! दिग्गजांचा ‘भाजप’ प्रवेश; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नावाचीही आवई..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिना अखेरीस राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. मतांची बेगमी करुन भाजप चौथी जागाही पटकावण्याचा मनसूबा बाळगून आहे. अशातच लोकसभा निवडणूकही समीप असल्याने भाजपकडून ‘धक्कातंत्रा’चा वापर होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी ‘ईडी’च्या रडारवर असलेल्यांसह राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून असलेल्या दोनशे विरोधकांची ‘यादी’ तयार केली असून त्यातून संगमनेरचे आमदार व काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाचीही आवई उठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील या ‘महापक्षांतर’ सोहळ्याची तारीखही 25 फेब्रुवारी ठरवण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. खरेतर पक्षाच्या कठीणकाळात थोरात यांनी जोरकसपणे उभारी घेण्याची जिद्द दाखवून राज्यात अडगळीत गेलेल्या काँग्रेसमध्ये ‘प्राण’ फुंकले. त्याचा परिपाक महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षाला सत्तेची फळेही चाखता आली. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा ‘खोडसाळ’ आहे की ‘वास्तव’ याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यासाठी पंधरा दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.


येत्या 27 फेब्रुवारीरोजी विधान परिषदेतील सहा जागांसाठी मतदान होत आहे. संख्याबळानुसार भाजपाला तीन आणि शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी एक जागा सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मतांचा कोटा 41 आहे. काँग्रेसचे 44 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा असे 54 संख्याबळ असल्याने काँग्रेसला ही निवडणूक वरकरणी सोपी आहे. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्यासोबतच्या 10 आमदारांच्या गटाला मान्यता दिली असली तरीही विधानसभेचे अध्यक्ष कोणाचा ‘व्हिप’ अधिकृत मानतात हे महत्वाचे ठरणार आहे. असे झाल्यास काँग्रेसकडे अवघे 44 मतदान शिल्लक राहील व त्यातच मतांची बेगमी करण्याचा मनसूबा भाजपने आखल्याची राजकीय वुर्तळात चर्चा आहे.


भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शहा यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 42 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी राज्यातील अन्य राजकीय पक्षांची तोडफोड करुन भाजपची ताकद वाढवण्यावर भर दिला जाण्याचे संकेत आहेत. त्यासाठी केंद्रीय अंमलबजावणी संचनालयाचाही (ईडी) पुरेपूर वापर होणार असून रडावरवर असलेल्यांसह वर्तमान आणि भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करुन महत्त्वकांक्षा बाळगणार्‍या जवळपास दोनशे राजकीय नेत्यांची यादी भाजपने तयार केल्याची जोरदार चर्चा आहे. 27 फेब्रुवारीरोजी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी यासर्वांचा प्रवेश घडल्यास भाजपने मनसूबा बांधलेली चौथी जागाही पदरात पाडून विरोधकांना धक्का देण्याची योजना आखण्यात आल्याचेही बोलले जात आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीवेळी राजकीय नाट्य उभारले होते. सरतेशेवटी अपक्ष उमेदवारी दाखल करुन त्यांनी विजय मिळवला. पक्षादेश डावलून मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षाने डॉ.सुधीर तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. मात्र त्यानंतरही डॉ.तांबे काँग्रेसच्या मंचावरुन काम करीत राहीले. या दरम्यान त्याचे सुपूत्र आमदार सत्यजीत यांनी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील अनेकांशी जवळीक साधल्याने ते प्रकाश झोतात आले. मात्र त्यानंतरही त्यांनी काँग्रेस सोडून अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला नाही.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उत्तराधिकारी म्हणून डॉ.जयश्री थोरात यांचे नाव पुढे आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच उमेदवारीची चर्चा आहे. देशात भाजपची घोडदौड पाहता सत्तेसोबत जाणे क्रमप्राप्त असल्याने डॉ.जयश्री थोरात यांचा भाजप प्रवेश होईल, मात्र त्याचवेळी माजीमंत्री थोरात मात्र काँग्रेसमध्येच राहतील. यामुळे उत्तराधिकार्‍याच्या हाती सूत्रे सोपविण्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्वप्न पूर्ण होईल, मात्र त्यासाठी ते विचारांची प्रतारणा न करता स्वपक्षातच थांबतील अशी ती ‘आवई’ असून यापूर्वीही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ती उठवण्यात आली होती. सध्या सुरु असलेल्या या चर्चेला 25 फेब्रुवारीची सिमारेषा असल्याने पंधरवड्यातच यामागील वास्तवही समोर येणारच आहे.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात गेल्या चार दशकांपासून संगमनेरचे प्रतिनिधीत्व करतात. सन 1999 साली राज्यातील काँग्रेसमधील दिग्गजनेते शरद पवार यांच्यासोबत जात असतानाही त्यांनी काँग्रेसचा हात सोडला नाही. 2014 च्या मोदी लाटेत राज्यातील पक्षही अक्षरशः लयाला गेल्याची स्थिती निर्माण झाली होती. अशावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारुन पक्षाला कठीणकाळातून बाहेर काढण्यासह थेट सत्तेच्या खुर्चीत नेवून बसवले होते. काँग्रेसचे बाजीप्रभु म्हणूनही त्यांच्या नावापुढे बिरुद लावले गेले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या जन्मसोहळ्यातून काही गोष्टी समोर आल्याने सध्या सुरु असलेल्या चर्चेला काहीसे बळही मिळत आहे. पाच दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यानिमित्त शहर व परिसरात असंख्य फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र त्यावरुन सोनीया, राहुल व प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रतिमांसह काँग्रेसचे निवडणूक चिन्हही गायब झाल्याने संशयही वाढवला आहे. त्यामुळे यातील वास्तव समोर येण्यासाठी पंधरवड्याची प्रतिक्षा हाच पर्याय आहे.


गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात सुरु असलेल्या या राजकीय चर्चेचा परिणाम सोशल माध्यमातही बघायला मिळत आहे. गेली अनेक वर्ष भाजपचे निष्ठावान कायकर्ते म्हणून वावरलेल्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांची आगपाखड वरील चर्चेला बळ देणारी आहे. एका माजी नगरसेवकाने तर थेट तारखेसह उल्लेख करीत ‘ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला, घरादारावर नांगर फिरवला’ त्यांचीच तळी उचलावी लागणार असेल तर दुर्दैव असे म्हणतं आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. तर काहींनी आपण आयुष्यभर सतरंज्याच उचलणार आहोत का? असा प्रश्‍नही विचारला आहे. यासर्व चर्चा आणि त्यावर उमटणार्‍या क्रिया-प्रतिक्रिया आगामी कालावधीत राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत देणार्‍याच आहेत.

Visits: 35 Today: 1 Total: 116582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *