भंडारदरा धरणातून सात हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला! पावसाचा जोर वाढला; धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यास सुरुवात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शुक्रवारपासून धरणांच्या पाणलोटात काहीशी उसंत घेणार्या पावसाला मागील 24 तासांत पुन्हा एकदा जोर चढला आहे. त्यामुळे रोडावलेल्या ओढ्या-नाल्यांना पुन्हा एकदा जोश चढला असून धरणांमधील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुढील कालावधीत पावसाचा जोर टिकून राहण्याचा अंदाज असल्याने धरणांसह नदीकाठावरील गावांची सुरक्षितता म्हणून आज सकाळपासून भंडारदर्याचा सांडवा तब्बल तीनवेळा वरती उचलण्यात आला असून सकाळी 11 वाजल्यापासून धरणातून 6 हजार 992 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. चालू हंगामात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून पावसाचा अंदाज लक्षात घेवून विसर्गात बदल केले जाणार आहेत. सध्या भंडारदर्याचा पाणीसाठा 90 टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावर गेल्या वीस दिवसांपासून पावसाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच लहान व मध्यम स्वरुपाचे जलसाठे तुडूंब झाले असून मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. आत्तापर्यंतच्या पावसाची सरासरी पाहता भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणं भरल्यात जमा असून अद्यापही पावसाचा मोठा कालावधीत शिल्लक असल्याने धरणं व लाभक्षेत्रातील नदीकाठावरील लोकवस्तीच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून भंडारदर्याची पाणीपातळी 90 टक्क्यांवर नियंत्रित केली जात आहे. एकीकडे भंडारदर्याचा विसर्ग आज सकाळच्या सत्रात तीनवेळा बदलला गेला असला तरीही निळवंड्यातून मात्र अद्यापही 5 हजार 190 क्यूसेकनेच पाणी सोडले जात असल्याने सध्या निळवंडे धरणही 90 टक्क्यांवर नेण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते.
मागील आठवड्याच्या शेवटच्या कालावधीत पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला होता. त्यामुळे धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही कमी करण्यात आला होता. मात्र रविवारी (ता.24) राहिणी नक्षत्राच्या पूर्वार्धात अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने व रविवारपासून संपूर्ण पाणलोटात पावसाचा झंझावात सुरू झाल्याने मरगळलेल्या ओढ्या-नाल्यांना पुन्हा एकदा जोश चढला असून मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमधील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या भंडारदरा धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यास सुरुवात झाली असून तासागणीक पाणीसाठ्याचे मोजमाप करुन त्यानुसार विसर्ग कमी-जास्त केला जात आहे.
गेल्या चोवीस तासांत बरसलेल्या तुफानी जलधारांनी भंडारदर्याचा जलसाठा फुगवण्यास सुरुवात केल्याने आज सकाळी सहा वाजता धरणातून 4 हजार 748 क्यूसेकने पाणी सोडले जात होते. मात्र पाण्याची आवक वाढतच असल्याने सकाळी 08 वाजता पुन्हा एकदा धरणाच्या वक्राकृती सांडव्याची दारं वरती उचलण्यात येवून 5 हजार 892 क्यूसेक तर त्यानंतर सकाळी 11 वाजता पुन्हा त्यात वाढ करुन 6 हजार 992 क्यूसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सदरचे पाणी निळवंडे धरणात अडविले जात असून निळवंडेतून अद्यापही 5 हजार 190 क्यूसेक पाण्याचाच प्रवाह सोडला जात असल्याने सध्या निळवंडेची पाणीपातळी वाढवली जात असल्याचे दिसून येत आहे. पाणलोटातील पावसाचा जोर कायम राहील्यास भंडारदर्याप्रमाणे निळवंड्यातूनही मोठा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणासह आढळा व भोजापूर धरणांच्या पाणलोटातही पावसाची गती वाढल्याने या दोन्ही धरणांच्या भिंतीवरुन वाहणार्या विसर्गातही वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी काही प्रमाणात संकुचित झालेले आढळा व म्हाळुंगी नद्यांचे पात्र पुन्हा फुगले असून आज सकाळी आढळा नदीतून 410 क्यूसेक तर म्हाळुंगी नदीपात्रातून 450 क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. ओझर जवळील बंधार्यावरुन प्रवरा नदीपात्रात चार हजार क्यूसेकने जायकवाडी धरणाकडे पाणी वाहत आहे. गोदावरी उर्ध्वभागातील सर्वच धरणांच्या पाणलोटातील पावसाने यंदा जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातही चैतन्य निर्माण केले असून गंगापूर व दारणा धरणातील विसर्गामुळे नांदूर मधमेश्वर बंधार्यावरुनही तब्बल 28 हजार 930 क्यूसेकने जायकवाडीच्या जलसाठ्याचा फुगवठा वाढत आहे.
गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस आणि धरणांचे पाणीसाठे पुढील प्रमाणे – मुळा 18 हजार 340 दशलक्ष घनफूट (70.54 टक्के), भंडारदरा 9 हजार 903 दशलक्ष घनफूट (89.71 टक्के) व निळवंडे 6 हजार 804 दशलक्ष घनफूट (81.70 टक्के). पाऊस घाटघर 178 मि.मी., रतनवाडी 158 मि.मी., भंडारदरा 139 मि.मी., वाकी 119 मि.मी., निळवंडे 18 मि.मी., आढळा चार मि.मी. व अकोले आठ मि.मी.
गोदावरी नदीच्या उर्ध्वभागातील धरणांना दरवर्षी समन्यायी पाणीवाटपाची धास्ती असते. यावेळी मात्र ही धास्ती अवघ्या 15-20 दिवसांच्या पावसानेच नाहीसी केली असून मराठवाड्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला असून महाकाय जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठाही 94 हजार 202 दशलक्ष घनफूट (91.70 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 67 हजार 141 दशलक्ष घनफूट (88.88 टक्के) झाला आहे. 30 सप्टेंबररोजी या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास राहीलेली तूट वरील धरणातून पाणी सोडून भरुन काढावी लागते, यावर्षी मात्र जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने उर्ध्वभागातून पाणी सोडण्याची आवश्यकता राहिलेली नाही.