कुंभारवाडीच्या शेतकर्‍याची ऑनलाईन फसवणूक! भलतेच आधार केले खात्याशी लिंक; परस्पर काढून घेतले सात लाख..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडीत राहणार्‍या एका शेतकर्‍याच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याला भलत्याच व्यक्तिचा आधार क्रमांक लिंक करुन, त्यांच्या खात्यातून परस्पर 6 लाख 80 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकर्‍याने अहमदनगरच्या सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी लिंक करण्यात आलेल्या ‘त्या’ आधारकार्ड धारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाइन व्यवहार करताना बँक खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक भरल्यानंतरच व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र तब्बल पाच महिने टप्प्याटप्प्याने सुरु असलेल्या या फसवणुकीची कोणतीही कल्पना त्या शेतकर्‍याला आली नाही. त्यामुळे या प्रकरणात बँकेतील एखाद्या कर्मचार्‍याचा तर सहभाग नाही? अशीही शंका निर्माण झाली आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुंभारवाडीत राहणार्‍या भागवत गागरे या शेतकर्‍याचे गेल्या दहा वर्षांपासून संगमनेरातील इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. पाच महिन्यांपूर्वी 18 जूनरोजी त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर बँकेचा नियमीत संदेश (मेसेज) प्राप्त झाला होता, त्यात त्यांच्या बँक खात्यात 7 लाख 20 हजार 657 रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र पाच महिन्यांनंतर 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्राप्त झालेल्या बँकेच्या अशाच संदेशातून त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर कमी होवून त्या तारखेला खात्यात केवळ 47 हजार 238 रुपये शिल्लक असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे गडबडून गेलेल्या त्या शेतकर्‍याने दुसर्‍याच दिवशी (ता.2) संगमनेरातील इंडियन ओव्हरसीज बँकेत जावून शाखाधिकार्‍यांकडे चौकशी केली.

यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी 18 जून ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यातून 6 लाख 80 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आल्याचा अहवाल त्यांना सोपविला. त्यातील पैसे काढण्याचा नियमीत प्रकार पाहून धक्का बसलेल्या त्या शेतकर्‍याने बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून या कालावधीत आपण कधीही पैसे काढले नाहीत व ऑनलाईन पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी क्रमांकही कोणाला दिला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर बँकेच्या व्यवस्थापकांनी तुमच्या खात्यातून बायोमॅट्रीक पद्धतीचा वापर करुन पैसे काढले गेल्याची माहिती त्यांना दिली. मात्र या पद्धतीने आपण कधीही बँकेतून पैसे काढले नसल्याचे त्या शेतकर्‍याने सांगितल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी त्यांचा आधार क्रमांक पडताळला असता त्यांच्या बँक खात्याला भलत्याच नावाचा आधार क्रमांक संलग्न करण्यात आल्याची बाब समोर आली.

मात्र सदरील शेतकर्‍याने आपले बँक खाते आपण कधीही आधारशी लिंक केले नसल्याचे सांगत माझा आधार क्रमांक नसताना दुसर्‍याचा आधार क्रमांक माझ्या खात्याशी कोणी व कधी लिंक केला असा सवाल उपस्थित केला. त्यावर बँकेच्या व्यवस्थापकांनी आपणास याबाबत कोणतीही माहिती नसून याबाबत आपल्या पातळीवरुन वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्या शेतकर्‍याला सांगितले. हा सगळा प्रकार ऐकून गंभीर झालेल्या त्या शेतकर्‍याने बँकेतून थेट घर गाठीत घडला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला व याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी अहमदनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार अहमदनगरच्या सायबर गुन्हे विभागाने सदरील शेतकर्‍याच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील खात्याला परस्पर वेगळाच आधार क्रमांक संलग्न करुन 6 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संलग्न करण्यात आलेल्या ‘त्या’ आधार क्रमांकाच्या धारकावर भा.दं.वि. कलम 419, 420 सह माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. या प्रकरणात कोणीतरी अज्ञात इसमाने परस्पर वेगळ्याच व्यक्तिचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुन बायोमॅट्रीक पद्धतीने हाताच्या ठशाचा वापर करुन पैसे काढले आहेत. या प्रकारामागे बँकेतील एखाद्या कर्मचार्‍याचा सहभाग असण्याचीही दाट शक्यता आहे. सायबर पोलिसांकडून या सर्व शक्यतांचा गांभीर्याने तपास करण्यात येत असून लवकरच त्यामागील वास्तवाचे दर्शन घडणार आहे. मात्र या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


बँकेतील खात्याला आधार क्रमांकासह खातेधारकाचा मोबाईल क्रमांकही संलग्न केलेला असतो. या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याने कधीही आपले खाते आधारशी संलग्न केले नव्हते. तसेच, गेल्या मोठ्या कालावधीपासून त्यांनी बँकेत कोणताही व्यवहार केला नसल्याने कोविडमध्ये ‘या’ खातेधारकाचे काही बरेवाईट झाले असेल असा विचार करुन त्यांच्या खात्याशी भलत्याचे आधार संलग्न करुन बायोमेट्रीक पद्धतीने पैसे काढण्याचा हा प्रकार आहे. यातही गोम म्हणजे बँक खात्याची कोणतीही माहिती बँकेतील कर्मचारी व खातेधारकाशिवाय अन्य कोणालाही प्राप्त होवू शकत नाही. या प्रकरणात मात्र आधार संलग्न नसल्याचे समजल्यावर फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणात सदरील बँकेतील एखाद्या कर्मचार्‍याचा सहभाग असण्याचीही दाट शक्यता नाकारता येणार नाही.

Visits: 42 Today: 1 Total: 437496

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *