तब्बल पन्नास हजार प्रेक्षकांनी अनुभवला महानाट्याचा थरार संगमनेरात शिवपुत्र संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सादर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता.४) सुरू झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला पन्नास हजार प्रेक्षकांच्या अलोट गर्दीने सुरुवात झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले व महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहताना प्रेक्षकांनी रोमांच अनुभवला असून उपस्थित प्रत्येकाच्या जीवनातील हा अभूतपूर्व व अविस्मरणीय प्रसंग ठरला.

संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याला सुरुवात झाली. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात खासदार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, कांचन थोरात, दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, रामहरी कातोरे, इंद्रजीत थोरात, मिलिंद कानवडे आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. व सौ. राजेश मालपाणी, शंकर खेमनर व के के. थोरात यांच्या हस्ते दीपप्रज्वल करण्यात आले. तर श्री. व सौ. मिलिंद औटी, श्री. व सौ. विश्वास मुर्तडक, मीरा शेटे, श्री. व सौ. सीताराम राऊत यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले. सौ. शोभा व दिलीप पुंड, श्री. व सौ. सोनाली शिंदे, श्री. व सौ. संगीता उत्तम कुदणर, श्री. व सौ. नवनाथ अरगडे यांच्या हस्ते अश्व पूजन करण्यात आले. तर श्री. व सौ. आरिफ देशमुख, श्री. व सौ. अफजल शेख, श्री. व सौ. किरण मिंडे, श्री. व सौ. सुनंदा जोर्वेकर यांच्या हस्ते शस्त्र पूजन झाले. तर श्री. व सौ. विजयकुमार फिरोदिया व श्री. व सौ बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. अत्यंत आकर्षक सजावट, उत्कृष्ट बैठक व्यवस्था, वाहनतळ आणि सुमारे ५० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या महानाट्याला शाहिरी डफाने व आतिषबाजीने सुरुवात झाली.

शंभूराजांचा जन्मोत्सव, आग्र्यामधून बाल शंभूराजांची सुटका, दिलेरखानाला दिलेले आव्हान हे सर्व प्रसंग अंगावर शहारे आणत होते. सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीत भव्य रंगमंच जणू रायगडाची जाणीव करून देत होता. अशातच सह्याद्रीचा छावा शिवपुत्र संभाजी महाराजांची रुबाबदार घोड्यावरून प्रेक्षकांमधून शानदार एन्ट्री झाली. डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होतात प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. महानाट्यातील वाक्य न वाक्य अंगावर शहारे आणत होतं. मराठ्यांच्या तेजस्वी आणि धगधगत्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या या महानाट्याने अनेकदा सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आणले. अभिनेते महेश कोकाटे यांनी साकारलेल्या अनाजी पंतांनी प्रचंड चिड आणली. तर अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे साकारलेल्या येसूबाईची भूमिका संस्मरणीय ठरली.
समुद्रावरील जंजिरा मोहीम, बुर्‍हाणपूर हल्ला, मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण, कडवट औरंगजेब बादशहा यांचे संवाद हे सर्व अद्भूत होते. संभाजी राजांना फितुरी करुन अटक आणि मराठी मातीसाठी झालेले त्यांचे हाल आणि मृत्यू यामुळे प्रत्येकजण गहिवरून आला आणि याचबरोबर प्रत्येकाची छातीही शिवपुत्र संभाजी यांच्याबद्दल अभिमानाने भरून आली. संगमनेरच्या दोनशे कलाकारांचा सहभागही उल्लेखनीय ठरला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांचा इतिहास जिवंत केला आहे. सर्व संगमनेरकरांसाठी ही मोठी आनंद पर्वणी आहे. सहकार, शिक्षण, सर्व सुख-सुविधा, पाणी, सुसंस्कृत वातावरण, सर्वधर्म समभाव, सर्वांना समान संधी यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून राज्यात सर्वात पुढे आहे. याचबरोबर या दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले असून डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी आल्याने शेतकर्‍यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका हा एक परिवार असून भक्कम कार्यकर्त्यांची फळी, नागरिकांची साथ यामुळे ही विकासाची घोडदौड आपण सर्व मिळून अशीच पुढे नेऊया असे आवाहनही त्यांनी केले.

Visits: 104 Today: 2 Total: 1100667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *