जगाशी स्पर्धा करताना गुणवत्तेशी तडजोड नको ः डॉ. गायकवाड संगमनेर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
हर घर तिरंगा लढा महान : माझा तिरंगा माझी शान हा उपक्रम निश्चितच भारतीयांचा उत्साह वाढविणारा क्षण आहे. स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेकांनी आपल्या घरादाराचा त्याग केला. कित्येकांनी रक्त वाहिले त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. हसत हसत फासावर लटकणार्या वीरांच्या बलिदानाचे स्मरण तरुण पिढीला झाले पाहिजे. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल यांचे कार्य पुढील पिढीला सदैव प्रेरणादायी राहील, असे मत संगमनेर महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना तिरंगी ध्वजाला मानवंदना दिल्यानंतर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी आपल्या अभिभाषणात मांडले.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, ज्ञान, विज्ञान आणि भौतिक संशोधनामध्ये भारताने उत्तुंग भरारी मारलेली आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या मानवी मूल्यांची देणगी भारताने जगाला दिली आहे. विविधतेतून एकता असणार्या आपल्या देशात संधीची समानता याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हे होय. क्रीडा क्षेत्रातील भारताची कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे. विशेषत: योगासन या खेळाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. डॉ. संजय मालपाणी यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयातील क्रीडांगणावर झालेल्या ध्वजारोहणासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, व्यवस्थापन समितीचे सदस्य ओंकारनाथ बिहाणी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र तशिलदार, डॉ. राजेंद्र ढमक, एनसीसीचे सीपीओ प्रा. डॉ. नरेंद्र फटांगरे, क्रीडा संचालक डॉ. अजितकुमार कदम, प्रबंधक संतोष फापाळे, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचालन परेड केल्यानंतर, शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.