संगमनेरच्या कांदा व्यापार्‍यास पन्नास लाखांना गंडविले! कर्नाटकातील दोघा ठगांचा प्रताप; संगमनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतकर्‍यांकडून कांद्याची खरेदी करुन नंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या घाऊक व्यापार्‍यांना त्याची विक्री करणार्‍या संगमनेरातील मोठ्या कांदा व्यापार्‍यास कर्नाटकातील दोघांनी गंडवण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बाजार समितीमधील याह्याखान अय्युबखान पठाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेरात यापूर्वीही कांद्यातून फसवणूकीचे प्रकार घडले असतांना आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने आणि यावेळी तब्बल पन्नास लाखांची फसवणूक झाल्याने संगमनेरच्या व्यापार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार याह्याखान अय्युबखान पठाण (वय 53, रा.मोगलपुरा) यांचा संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यवसाय आहे. बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांकडून आलेल्या कांद्याची खरेदी करुन नंतर देशभरात विविध ठिकाणच्या घाऊक व्यापार्‍यांना त्याची विक्री केली जाते. त्यानुसार पठाण यांनी बेंगलोर (कर्नाटक) येथील शिवकुमार सनाफ या घाऊक व्यापार्‍यास 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2021 या कालावधीत 29 लाख एक हजार 176 रुपयांचा कांदा पाठविला होता.

कर्नाटकातील सदरच्या व्यापार्‍याने यापूर्वीही संगमनेरात अशाप्रकारे व्यापार केला होता, मात्र वेळेवर त्याचे देणे चुकवून त्याने बाजार समितीमधील अन्य व्यापार्‍यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे पठाण यांनीही व्यापार विश्वासाचे पालन करीत संबंधिताच्या शब्दावर भरवसा ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला कांदा पाठविला. मात्र ठरलेल्या वायद्यानुसार त्याच्याकडून मालाच्या पोटीचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी पैशांसाठी तगादा सुरु केला. सुरुवातीला त्याने देतो, करतो म्हणत वेळ मारुन नेल्यानंतर फोन घेणेही बंद केले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पठाण यांच्या लक्षात आले. मात्र या उपरांतही संबंधिताकडून आपले पैसे मिळतील या भरवशावर ते वाट बघत राहिले.

या दरम्यान बेंगलोर येथीलच अब्दुल आलम या अन्य एका व्यापार्‍याशी त्यांची ओळख झाली. त्यातून आधीच्या प्रकाराबाबतही चर्चा झाली. यावेळी अब्दुल आलम याने आपण तुमचे पैसे काढून देण्यास मदत करु असे आश्वासन देत याह्याखान पठाण यांचा विश्वास संपादन केला व त्यातूनच त्यानेही त्यांच्याकडून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. पठाण यांनीही आधी फसवणूक झालेली असतानाही संबंधितावर अंधविश्वास ठेवत 3 जून ते 14 जून 2022 या कालावधीत एकूण 20 लाख 2 हजार 797 रुपयांचा कांदा त्याला पाठविला. मात्र त्यानेही पूर्वीच्याच गंडखोराचा कित्ता गिरवताना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अवघ्या वर्षभराच्या कालावधीत आलेल्या या दोन संकटांनी याह्याखान पठाण यांची कर्नाटकच्या या दोघा व्यापार्‍यांनी तब्बल 49 लाख 3 हजार 973 रुपयांची फसवणूक केली.

वारंवार फोन, तगादा करुनही पैसे मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या याह्याखान पठाण यांनी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेवून त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यानुसार त्यांनी शहर पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी कर्नाटकातील वरील दोघा ठकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत पुढील पहिल्या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांच्याकडे तर दुसर्‍या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेने संगमनेरच्या भाजी व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *