संगमनेरच्या शासकीय अधिकार्‍यांना राजकीय डासाचा दंश! सिग्नलवरुन उडवाउडवी; शहर पोलीस निरीक्षक आश्वासने देण्यातच धन्य..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रासलेले असतानाही पोलीस आणि पालिकेची यंत्रणा ढिम्मच असल्याचे दिसत आहे. यावर वाहतूक नियमन हा एकमेव पर्याय आहे. मात्र पालिकेने सामान्यांना त्रास मुक्त करण्यापेक्षा केवळ पैसा लाटण्याचेच धोरण राबवल्याने सुरुवातीपासूनच पालिकेने परस्पर उभारलेल्या सदोष सिग्नल यंत्रणेचा वापर करण्यास पोलीस तयार नाहीत. अखेर पालिकेच्या प्रशासकांनी पोलिसांच्या मागण्या मान्य करीत पाचातले तीन सिग्नल बंद ठेवून दोघांची दुरुस्तीही केली व वाहने थांबवण्यासाठीचा वेळ पोलिसांनीच ठरवण्याची मुभाही दिली, त्यासाठी लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला. त्याबाबतची माहिती देताना शहर पोलीस निरीक्षकांनी सिग्नलची गरज असल्याचे सांगत नववर्षात त्यावरुन नियमन करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या ‘त्या’ आश्वासनाला आता महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे, त्यावरुन सध्याच्या काळात शासकीय अधिकार्‍यांनाही राजकीय डास चावल्याचे दिसू लागले असून त्यांच्याकडूनही राजकीय नेत्यांप्रमाणेच केवळ वेळ मारुन नेण्याचा उद्योग सुरु आहे.

वैभवशाली शहराची टिमकी वाजवणार्‍या संगमनेर शहराची अंतर्गत वाहतूक व्यवस्था अतिशय गचाळ आहे. प्रत्येक रस्त्यावर दाटलेली प्रचंड अतिक्रमणं, जागोजागी निमुळत्या रस्त्यावर परस्पर तयार झालेले रिक्षाथांबे, नव्याने बांधकाम करणार्‍यांकडून चिरीमिरी घेवून पार्किंगशिवाय उभ्या राहणार्‍या वास्तू, शहरातील दुचाक्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि एकंदरीत शहरी रस्त्यांवरील वाहतुकीत मोठी वाढ यामुळे सतत वाहतूक कोंडी, बाचाबाची आणि भांडणे वाढली आहेत. शहराच्या या बेशिस्तीला बहुतांश स्थानिक राजकारणीही कारणीभूत आहेत. बसस्थानकाच्या परिसरात सतत होणार्‍या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार असूनही येथील बेकायदा रिक्षाथांबा आजवर कोणीही हटवू शकलं नाही, त्यामागे संगमनेरच्या राजकीय नेत्यांचाच हात असल्याचेही लपून राहिलेलं नाही.

शहराची बेशिस्ती वाढवण्यासह या राजकारण्यांनी विकास म्हणजे ठेकेदारीतून अखंड लुट असे सूत्र रुजवले असून त्यातूनच ३५ लाख रुपयांचे सिग्नलचे लुकलुकते दिवे खरेदी केले गेले. मात्र आजवर कधीही या सिग्नलचा वाहतुकीसाठी वापर झाल्याचे दिसून आले नाही. विशेष म्हणजे पालिकेने पोलिसांना विश्वासात न घेताच शहरातील पाच ठिकाणी सिग्नलचे खांब उभे केले. त्यातील सर्वात महत्त्वाचा खांब हॉटेल काश्मिरसमोरही उभारला गेला. मात्र तेथील सिग्नल सुरु करण्यासाठी आधी तेथील बेकायदा रिक्षाथांबा हटवण्याची गरज असल्याने पोलिसांनी तसा प्रयत्न करताच त्यांच्यावर ‘दबाव’ आणला गेला. यावरुन संगमनेरच्या वाढत्या बेशिस्तीला कोणाचे पाठबळ आहे हे देखील दिसून आले आहे.

दैनिक नायकने आपली बांधिलकी ओळखून वेळोवेळी जनतेच्या कररुपी पैशांचा पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी केलेला गैरवापर चव्हाट्यावर आणला. त्यातून पालिकेच्या प्रशासकांनी डिसेंबरमध्ये तीनबत्ती चौक व हॉटेल काश्मिरसमोरील सिग्नल सुरु करण्याची कवायत पूर्ण केली. आठ दिवसांतच झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याचे आश्वासन देत पोलिसांना त्यावरुन नियमन करण्याची लेखी विनंतीही करण्यात आली. या सर्व घडामोडींना आता महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. सिग्नलच्या दुरुस्तीनंतर पोलीस निरीक्षकांकडे याबाबतच विचारणा केली असता त्यांनीही शहराच्या वाहतुकीला सिग्नलची गरज असल्याचे दैनिक नायकला सांगितले व आठ दिवसांत कर्मचार्‍यांची तजबीज करुन दोन ठिकाणची सिग्नल व्यवस्था सुरु करणार असल्याचेही जाहीर केले. मात्र त्यांचेही आश्वासन आता महिन्याचे झाले आहे.


या सर्व घडामोडी पालिकेच्या प्रशासकांसह शहर पोलीस निरीक्षकांनाही राजकीय डास चावल्याचेच दर्शवणार्‍या असून लोकसेवक असलेल्या या अधिकार्‍यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलाय की काय अशी शंकाही निर्माण करणार्‍या आहेत. खरेतर तीनबत्ती आणि हॉटेल काश्मिर या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस तैनातच असतात, केवळ त्यांना वेळ ठरवून सिग्नलवरुन नियमन सुरु करण्याचे आदेश देणं बाकी आहे. मात्र पोलीस निरीक्षकांना महिना उलटूनही या गंभीर नागरी समस्यांकडे बघायला वेळच मिळत नसल्याने सामान्य संगमनेरकर वारंवार कोंडीत अडकून प्रशासनाच्या नावाने आपली बोटं मोडीत आहे.


एकीकडे संगमनेर नगरपालिकेकडून शहरात पूर्वीप्रमाणेच कामांचा सपाटा सुरु आहे. वर्षभरापूर्वी तयार झालेले कोट्यवधीचे रस्ते जेसीबी यंत्राने फोडून त्यात पुंगळ्या टाकल्या जात आहेत. या सर्व गोष्टी कशाच्या द्योतक आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शहर पोलीस ठाण्याचेही तसेच आहे. शहरात अगदी गांजापासून ते एमडीपर्यंत आणि लोटोपासून ते तिरटपर्यंत सर्व काही सुरळीतपणे सुरु आहे. त्यातून बाहेर पडण्यास सवडच मिळत नसल्याने सध्या शहरी वाहतुकीचे व्यवस्थापन वार्‍यावर आहे. त्यामुळे वैभवशाली संगमनेर शहरात सर्व काही आलबेल असल्याचेच चित्र दिसत आहे असे म्हणण्याची वेळ सामान्य माणसांवर आली आहे.

Visits: 28 Today: 1 Total: 115695

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *