पहिल्यांदाच वाजत-गाजत पूर्ण झाली शिवजयंतीची मिरवणूक! तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचा सोहळा; संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहाचे दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. शिवजयंतीच्या निमित्ताने संगमनेरातील चौकाचौकात शिवप्रतिमा उभारुन शिवशाहीचे पोवाडे वाजविले जात होते. शहरातील सर्वच रस्त्यांवर भगवे झेंडे व झालरी लावण्यात आल्याने सोमवारी संगमनेरात शिवशाही अवतरल्याचे चित्र दिसत होते. सायंकाळी नगरपालिकेपासून काढण्यात आलेल्या मिरवणूकीत तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यंदाच्या तिथीनुसारच्या शिवजयंती मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी सात वाजता सुरुवात होवूनही ही मिरवणूक रात्री दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पोहोचली. त्यामुळे पहिल्यांदाच शेवटपर्यंत मिरवणुकीतील वाद्ये आणि स्पीकर सुरु होते.

इतिहासकार आणि शासन यांच्यातील मतभेदातून राज्यात स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी तर तिथीनुसार फाल्गुल वद्य तृतीया अशी दोनवेळा साजरी करण्यात येते. राज्यातील बहुतांशी हिंदुत्त्ववादी संघटना छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत मानतात, त्यामुळे शिवसेनेसह विविध हिंदुत्त्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव तिथीनुसारच साजरा करतात. त्यानुसार यावर्षी सोमवार 21 मार्च रोजी संगमनेरात मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील बहुतेक प्रत्येक चौकात आणि गल्ल्यांमध्ये आकर्षक मांडव घालून छत्रपतींच्या प्रतिमा स्थापण्यात आल्या होत्या. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले. संपूर्ण शहरातील प्रत्येक रस्त्यावर फडफडणारे भगवेध्वज, भगव्या झालरींमुळे शहरात सोमवारी शिवशाही अवतरल्याचा भास होत होता. सकाळी शिवजयंती उत्सव युवक समितीने शहरातून मोटरसायकल रॅलीचेही आयोजन केले होते, त्यात शहर व तालुक्यातील तरुणांनी सहभाग घेतला. सायंकाळी सात वाजता शिवसेनेच्यावतीने पारंपरिक पद्धतीने शिवप्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

एरव्ही सायंकाळी सहा वाजता सुरु होणारी ही मिरवणूक यावर्षी मात्र सात वाजता निघाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे यावर्षीही चावडी चौक ते छत्रपती स्मारकापर्यंत ही मिरवणूक मूकपणेच न्यावी लागेल असा अंदाज वर्तविला जात असताना आश्चर्यकारकपणे मिरवणुकीची सांगता अगदी शासकीय वेळेतच झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने वाद्यांसाठी लागू केलेल्या वेळेच्या मर्यादेनंतर पहिल्यांदाच स्पीकरवरुन या मिरवणुकीच्या सांगतेनिमित्त छत्रपतींची आरती झाली. मिरवणुकीदरम्यान काही तरुणांमध्ये व्यक्तीगत कारणावरुन भांडणेही झाली, मात्र त्याचे स्वरुप मर्यादित असल्याने दोन वर्षांनंतर निघालेली शिवसेनेची ही पारंपरिक मिरवणूक शांततेत पार पडली. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, बारकू जाणे, निवांत जाधव, निकीता महाले यांच्यासह 25 पोलीस कर्मचारी, दहा महिला पोलीस कर्मचारी व बारा राज्य राखील पोलीस दलाच्या जवानांनी या दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.

तिथीनुसारच्या शिवजयंती निमित्ताने दरवर्षी शिवसेनेच्यावतीने शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कोविड संक्रमणानंतर दोन वर्षांनी यंदा ही मिरवणूक काढण्यात आली होती. या दरम्यान राज्यात शिवसेना-भाजपचा काडीमोड होवून सेनेने सत्तेची वेगळी चूल मांडली. त्यामुळे या मिरवणुकीत भाजपसह अन्य हिंदुत्त्ववादी संघटना सहभागी होतील का? असा प्रश्न होता, मात्र तो फोल ठरला. सोमवारी निघालेल्या या मिरवणुकीत भाजपसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही अनेक स्वयंसेवक दिसून आले.

Visits: 11 Today: 1 Total: 115819

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *