राहाता पालिकेने गाळाभाडे वसुली तत्काळ थांबवावी! व्यावसायिकांची आमदार राधाकृष्ण विखेंकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता नगरपरिषदेने गाळेधारकांना केलेली भाडे रक्कम सक्तीची वसुली तत्काळ बंद करावी. बिलाची रक्कम भरण्यासाठी हप्ते करून द्यावेत, अशी मागणी गाळेधारकांनी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राहाता नगरपरिषदेने नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल याठिकाणी असलेल्या गाळेधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेले गाळा भाडे रक्कम त्वरीत भरावे, अशी लेखी सूचना केली होती. सूचना करूनही गाळेधारकांनी थकीत गाळे रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात न केल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी गेल्या आठवड्यापासून थकीत गाळे भाडेधारकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगरपरिषदेच्या मालकीचे असलेल्या गाळ्याची गेल्या अनेक वर्षांपासून काही गाळेधारकांनी गाळेभाडे रक्कम नगरपरिषद कार्यालयात जमा केली नसल्याने त्यांची थकीत रक्कम कोटी रुपयांच्या पुढे गेली असल्याने नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी वसुली करणे गरजेचे असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात गाळेधारकांनी म्हटले आहे की, चितळी रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना 11 हजार रुपये अनामत रक्कम घेऊन गाळेभाडे तत्वावर दिले. आपण घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रातील व्यवसायिकांनी स्वागत केले. तसेच विस्थापितांना प्रस्तावित करून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली. करोनामुळे सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाल्याने आमच्याकडे 1 वर्षाचे भाडे थकले आहे. राहाता नगरपरिषदेने भाडे रकमेत जीएसटी रकमेची आकारणी केली आहे. तसेच दरमहा थकीत भाडे बिल रकमेत 2 टक्के व्याज व करोना काळातील 2 वर्षाचे गाळेभाडे माफ करावे, अशी सर्व गाळेधारकांची मागणी आहे. या निवेदनावर पोपट कोल्हे, बाळासाहेब सदाफळ, विवेक देव्हारे, संजय रंधवे, अनिल कोल्हे, प्रदीप पवार, जावेद सय्यद, एकनाथ पवार, मच्छिंद्र गाडेकर, चंद्रकांत मेहत्रे, सागर कहाणे, शब्बीर मणियार, रवींद्र सदाफळ देविदास अभाडे, अशोक सदाफळ, संदीप तुपे, गौरव आभाडे, आदेश तांबोळी, भाऊसाहेब दळवी, वैभव गाडेकर, अमोल चौधरी, शालिनी आत्रे, जगन्नाथ घोलप, सोमनाथ तुपे, संजय रंधे यांच्यासह आदी व्यावसायिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


चितळी रस्त्यालगत विस्थापित व्यवसायिकांना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 11 हजार रुपयांत गाळे घेऊन राज्यात इतिहास घडवीत व्यावसायिकांना पाठबळ देण्याचे काम केले. करोना काळात सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्याने व्यावसायिकांवर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले. पालिकेने गाळेधारकांना भाडे रकमेत सवलत देऊन थकीत बिल भरण्यासाठी हप्ते करून द्यावेत. तसेच करोना काळातील भाडे माफ करून आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना आधार द्यावा.
– बाळासाहेब सदाफळ (व्यावसायिक, राहाता)

Visits: 3 Today: 1 Total: 27350

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *