पठारभागात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी शेतकर्यांसह नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील शेतकरी गणेश सुपेकर हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.26) रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. सततच्या हल्ल्यांमुळे शेतकर्यांसह नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
![]()
जखमी शेतकरी गणेश सुपेकर मंगळवारी रात्री आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेत पंजा मारला. मात्र, अंगात स्वेटर असल्याने बिबट्याचे नखे हातावर ओरखडून जखमी झाले आहेत. तर अकलापूर शिवारातील भोरमळा येथील शिवाजी सुदाम भोर यांच्या गोठ्यात पहाटेच्या वेळी बिबट्याने प्रवेश करत वासरावर हल्ला केला. त्यावेळी भोर यांचा मुलगा वैभवने हे दृश्य पाहताच आरडोओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याचीही घटना घडली आहे. दरम्यान, पठारभागात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचे यावरुन अधोरेखित होत आहे. शेतकर्यांसह नागरिक बिबट्यांच्या दहशतीखाली राहत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरेही लावले असल्याचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी सांगितले.
