देवी भागवतामध्ये 51 वे शक्तीपीठ असलेली संगमनेरची सप्तश्रृंगी माता! पाचशे वर्षांहून अधिक मोठा इतिहास असलेल्या देवीच्या मंदिरात शिव आणि शक्तीचा दुर्मिळ संगम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाच शतकांहून अधिक प्राचिन असलेल्या संगमनेरच्या ग्रामदैवत सप्तश्रृंगी मातेच्या (मोठी देवी) मंदिरात नवरात्रौत्सव सुरू आहे. मात्र यंदा कोविडचे संकट असल्याने दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजर्या होणार्या येथील उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. देवी भागवतामध्ये 51 वे शक्तीपीठ म्हणून मान्यता पावलेल्या या देवीची कीर्ती केवळ संगमनेरच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात पसरलेली आहे. अगदी शहाजीराजांच्या काळापासून या मंदिराचे दाखले इतिहासातही उपलब्ध आहेत. सरकारी आदेशाने यंदाच्या उत्सवातही मंदिराचे दरवाजे बंद असले तरी शेकडो भाविक नियमांचे पालन करीत देवीच्या चरणी लांबूनच करुणा भाकित आहेत. श्रद्धेला मोल नसते, त्यामुळे मंदीर बंद असले तरीही भाविकांसाठी मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याचे विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अॅड.श्रीकांत गोंगे यांनी सांगितले.
हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या देवी भागवत या ग्रंथामध्ये संगमनेरच्या कसबापेठेतील सप्तश्रृंगी मातेचा 51 वे शक्तीपीठ म्हणून उल्लेख आहे. याशिवाय अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या मंदिराचे माहात्म्य वर्णीलेले आहे. शहाजीराजे भोसले जेव्हा पेमगिरी किल्ल्यावर गेले होते त्यावेळी जाताना त्यांनी कसबापेठेतील भगवतीचे दर्शन घेवूनच पुढचा प्रवास केल्याचे दाखलेही इतिहासात सापडतात. त्यासोबतच प्रवराकाठी मठ स्थापणार्या भवानी बुवांचीही देवीवर मोठी श्रद्धा होती. त्यांना देवीच्या दर्शनासाठी जाता यावे यासाठी मराठा साम्राज्यातील धुरंदर सरदार महादजी शिंदे यांनी भवानीशंकर बाग ते कसबा पेठेतील मंदिरापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीचे भुयारही तयार करुन दिल्याचे सांगितले जाते.
पाचशे वर्षांहून अधिक काळाचा मोठा इतिहास असलेल्या या मंदिराचा सुमारे दीडशे वर्षांपूर्वी जिर्णोद्धार करण्यात आला होता. मात्र नंतरच्या काळात मंदिराचा बराचसा भाग जीर्ण होवून मोडकळीस आल्याने नूतन विश्वस्त मंडळाने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करुन मंदिराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांच्या सहयोगातून सुरू असलेल्या या कामाला गती मिळण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. कोविडच्या संसर्गाचा परिणाम त्यावरही झाल्याने सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.
या शक्तीस्थानाच्या मागील बाजूला एक भुयार आहे. त्यात पंचमुखी शिवलिंग स्थापन केलेले आहे. याच भुयारातून थेट प्रवराकाठावरील भवानी शंकर बागेपर्यंत भुयारी मार्ग आहे. देशात प्रचलित असलेल्या शक्तीपीठांमध्ये देवी आणि शिवलिंग एकाच छताखाली असणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळे या देवस्थानात ‘शिव आणि शक्ती’ यांच्या संगमाचा सुरेख मिलाफही भाविकांना येथे येण्यास भाग पाडतो. नवरात्रौत्सवातील नऊ दिवस हजारो भाविक या शक्तीस्थळी येवून करुणा भाकतात, नवसाला पावणारी आई अशीही या देवीची महती सांगितली जाते.
अत्यंत पुरातन असलेल्या या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन मुंबई इलाख्यात 21 जानेवारी, 1952 साली मुंबई विश्वस्त अधिनियम लागू झाला. आणि त्याचवेळी संगमनेरच्या कसबा पेठेतील मोठ्या देवीच्या मंदीर व्यवस्थापनाने मंदिराची सार्वजनिक देवस्थान म्हणून नोंद केली, ती तारिख होती 26 डिसेंबर, 1952. अहमदनगर जिल्ह्यातील पहिले सार्वजनिक न्यास म्हणूनही या मंदिराची वेगळी ख्याती आहे. समाजातील सर्वच स्तरातील भाविकांना त्या त्या काळात देवीची उपासणा आणि सेवा केली आहे. त्यात (स्व.) विठ्ठलराव शंकरराव गोंगे, जयवंतराव गुंजाळ, शरद दातरंगे आदिंची नावे प्रामुख्याने घेतली जातात.
देवीच्या दैनंदिन पौराहित्याचे कार्य पिढीजातपणे (स्व.) दिनकरराव नरहर मुळे यांच्या कुटुंबाकडे होते. त्यासोबतच मंदिराचे पुजारी म्हणून (स्व.) हरीबाबा जाधव, देशपांडे व आत्तापर्यंत विश्वनाथ पेटकर यांनी अगदी निरपेक्ष भावनेने देवीची सेवा केली. 2015 साली अस्तित्त्वात आलेल्या नूतन विश्वस्त मंडळाने मंदिराच्या संपूर्ण जिर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले आहे. त्याचा पायाभरणीचा कार्यक्रमही तीन दशके मातेची सेवा करणार्या पेटकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. मातेच्या शक्तीस्थानाला धक्का न लावता या मंदिराचे काम सुरू असून मंदिरातील नक्षीकामात राजस्थानी बांधकामशैलीची झलक पहायला मिळणार आहे.
मोठा पुरातन वारसा लाभलेल्या या मंदिरात दरवर्षीच्या नवरात्रौत्सवात शेकडो महिला घटी बसवतात, त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी युक्त सभामंडप पूर्ण झाला असून मंदिराचे गर्भगृह व दर्शनीभागाचे काम सध्या खोळंबले आहे. संगमनेरचे ग्रामदैवत म्हणून मान्यता पावलेल्या आणि शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या या मंदिराच्या पुढील कामासाठी संगमनेरकरांच्या औदर्याची गरज आहे. अधिकाधिक भाविकांनी त्यासाठी सढळ हाताने मदत करुन या मंदिराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन श्री सप्तश्रृंगीदेवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.श्रीकांत गोंगे, उपाध्यक्ष राजेंद्र गुंजाळ, विश्वस्त महेश रहातेकर, शरद निचळ, उल्हाससिंग परदेशी, संजय सस्कर व शिरीष मुळे आदिंनी केले आहे.
सध्या कोविडच्या प्रादुर्भावामुळे शासकीय सूचनांनुसार मंदिरातील सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. मात्र देवीवर हजारों भाविकांची श्रद्धा असल्याने विश्वस्त मंडळाने कोविडच्या नियमांचे पालन करणार्या भाविकांसाठी मुखदर्शनाची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी दर्शनासाठी येताना मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतराचे पालन करावे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे, मात्र निधीची कमतरता असल्याने संगमनेरकरांच्या मदतीची गरज आहे. देवी भागवत ग्रंथामध्ये 51 वे शक्तीपीठ असलेल्या या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी दानशूर संगमनेरकरांनी सढळ हाताने मदत करावी अशी विनंती आहे.
– अॅड.श्रीकांत गोंगे
अध्यक्ष : श्री सप्तश्रृंगी देवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट