चुन्याची फक्की मारण्यावरुन शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण ! ज्ञानमाता विद्यालयातील धक्कादायक प्रकार; पंधरावर्षीय विद्यार्थ्याची तक्रार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणार्‍या शाळांमधील वातावरण कसे असावे याचे सर्वसामान्य निकष असतानाही अधुनमधून चर्चेत येणार्‍या ज्ञानमाता विद्यालयातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेळण्यासाठी मुलांकडूनच मैदानात चुन्याची फक्की मारुन घेत असताना हातातून दोरी सुटल्याच्या कारणावरुन शिक्षकाने एका विद्यार्थाच्या कानशिलात लगावण्यासह गचांडल्याने नववीत शिकणारा पंधरावर्षीय विद्यार्थी जखमी झाला. याप्रकरणी त्याच्या फिर्यादीवरुन गणित विषयाचे शिक्षक जॉय थोरात यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाने ज्ञानमाता विद्यालय पुन्हा चर्चेत आले असून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार बुधवारी सकाळी ज्ञानमाता विद्यालयाच्या मैदानावर घडला. नववीत शिकणारा समीर (नाव बदलले आहे) नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत गेला. दहा वाजता खेळाचा तास असल्याने मुलांना मैदानात आणले गेले. यावेळी गणित विषयाचे शिक्षक जॉय थोरात यांनी काही मुलांना दोरी पकडून फक्की मारण्याची सूचना केली. त्यानुसार दोन बाजूला दोघा विद्यार्थ्यांनी दोरी पकडली व तिसर्‍याने हातात चुन्याची पावडर घेवून रेषा ओढण्यास सुरुवात केली.

यावेळी शिक्षक थोरात यांनी ‘व्यवस्थित फक्की मारा रेऽ..’ असे दरडावून सांगितल्याने गडबडलेल्या समीरच्या हातून दोरी सुटली. त्यामुळे शिक्षकाला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने तडक समीरकडे धावत जावून त्याचा कान पकडून पिरगळला आणि डाव्या हाताने त्याच्या उजव्या कानशिलात थप्पड मारली, त्यामुळे समीरचा कान फुटला. त्यामुळे घाबरलेल्या समीरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र इवल्याशा गोष्टीचाही राग अनावर झालेल्या शिक्षक महोदयाने एकप्रकारे झडप घालीतच समीरचे मानगुट पकडले. या झटापटीत समीरच्या मानेलाही दुखापत झाली आणि त्याने घातलेले स्वेटरही फाटले.

हा सगळाच प्रकार धक्कादायक आणि समीरसारख्या अवघ्या पंधरा वर्षाच्या कोवळ्या मुलासाठी तर घाबरवून टाकणाराच आहे. त्याप्रमाणे समीरनेही सगळं काही शाळेतच सोडून तेथून थेट घराकडे धूम ठोकली. आजोबांना घडला प्रकार सांगितल्यानंतर घडल्या प्रकाराचे गांभीर्य वाढले. अनुशासनाचा भंग झाला असल्यास त्याला शालेय निकषांप्रमाणेच शिक्षा असायला हवी. या प्रकरणात मात्र या नियमांना सर्रास धुडकावले गेले आणि गुरुस्थानी असलेल्या, ज्ञानदान करणार्‍या शिक्षकानेच आपल्या शिष्याला अनुशासनाच्या नावाखाली ‘कठोर’ शिक्षा दिली.

याप्रकरणी जखमी विद्यार्थ्याने आपल्या भावासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानमाता विद्यालयातील गणिताचे शिक्षक जॉय थोरात यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२४, ३२३, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार करीत आहेत. या घटनेने गेली अनेक दशके ज्ञानदानाचे कार्य करणारी शाळा पुन्हा चर्चेत आली आहे. एखाद्या शिक्षकाने व्यक्तीगत मानसिकतेतून विद्यार्थ्यावर केलेले असले प्रकार अशा संस्थांच्या अव्याहत सेवेला धक्का लावतात. परंपरा असलेल्या संस्थेत सेवा करणार्‍यांनी नेहमी याचे भान ठवेण्याची आवश्यकता असते. या प्रकरणात तसे दिसून आले नाही, त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. या घटनेने संगमनेरच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.


पुण्याच्या सोसायटी ऑफ जीजस् यांनी १९४८ साली सुरु केलेल्या ज्ञानमाता विद्यालयाचे संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. संगमनेरच्या दोन पिढ्यांना सुशिक्षित करण्यात सिंहाचा वाटा असलेली हिच संस्था गेल्या काही काळापासून काही शिक्षकांच्या मनमानीमुळे चर्चेत येत आहे. त्यामुळे प्रदीर्घ शिक्षण सेवा देणार्‍या, पिढ्या घडवणार्‍या या ज्ञान मंदिराच्या लौकिकाला धक्का लागत आहे. शाळा व्यवस्थापनाने हा विषय गांभीर्याने घेवून सत्याच्या आधारावर कठोर होण्याची गरज आहे.

Visits: 403 Today: 2 Total: 1582164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *