राहुरी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना पकडले गावठी कट्ट्यासह दीड किलो गांजा केला जप्त

नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात गावठी कट्टा व गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना राहुरी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (ता.१९) सकाळी नगर-मनमाड महामार्गावर सापळा लावून पकडले. पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, की दोन अज्ञात तरुण हे राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्टा व गांजा विक्री करण्यासाठी येत आहेत अशी खबर गुप्त खबर्यामार्फत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, प्रवीण अहिरे, प्रवीण बागुल, गोवर्धन कदम, आजिनाथ पाखरे यांनी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर जुने बसस्थानक परिसरात सापळा लावला. काही वेळाने आरोपी तेथे मोटारसायकलवर आले. तेव्हा पथकाने मोठ्या शिताफीने आरोपींची धरपकड करत मुसक्या आवळल्या.

त्यांची अंगझडती घेतली असता १ किलो ४०० ग्रॅम गांजा, एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी जॉन कॅसिनो परेरा (वय ३६) व अब्दुल वाहद सय्यद शाबिर (वय ३१, दोघेही रा. अहमदनगर) यांना गजाआड करण्यात आले. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर राहुरी पोलिसांत आर्म अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.
