परिवर्तनासाठी शिक्षणासोबत सजगता महत्वाची ः पाटील सुजात फाउंडेशनच्यावतीने किसन चव्हाण यांना पुरस्कार प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजात परिवर्तन घडून आणावयाचे असेल तर केवळ साक्षरता वाढून साध्यता होणार नाही. त्यासाठी सजगता अधिक महत्त्वाची आहे. समाजातील वंचितांना त्यांचे हक्क प्रदान करण्याची गरज आहे. वसाहतवादाला बाजूला सारण्यासाठी लोकशाही अस्तित्वात आली. पण आज लोकशाहीमध्येच वसाहतवाद लपल्याचा अनुभव येत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील यांनी केले.

सुजात फाउंडेशनच्यावतीने कवी दिनकर साळवे यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नामवंत कवी पोपट सातपुते होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार सोमनाथ मुटकुळे, पुरस्कारप्राप्त किसण चव्हाण उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, बंडखोरीबद्दल असणारी परिकल्पना बदलत चालली आहे. संयम गमावला गेला आहे. वितंडवाद वाढतो आहेत. नव्या पिढीमध्ये असणारी सजगता कमी होते आहे. समाजातील सजगता उंचावण्यासाठी उत्तम साहित्याची गरज आहे. समाजात व्यक्त होण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. लोकशाहीच्या पलीकडे विस्तारवादी भूमिका वाढते आहे. वर्तमानात मते थोपवण्याचा विचार दिसतो आहे तो अत्यंत वाईट आहे. समाजात जे चांगले घडते आहे त्याला आधार देण्याची गरज आहे. आजच्या अतिवादाच्या भूमिकेबद्दल आपण अबोला धरून चालू लागलो तर भविष्य अंधारमय असल्याचा इशाराही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

अध्यक्षीय भाषणात सातपुते म्हणाले, युद्धखोर मानसिकतेच्या बाहेर पडण्याची गरज आहे. त्या प्रवृत्तीचा आपण निषेध करायला हवा. वर्तमानात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळी थांबल्या आहेत. जातीपातीत विभाजन होत आहे. साहित्याची वाटचाल आश्वासक दिसते आहे. साहित्याने अंतःर्मनाची ज्योत पेटवत ठेवली आहे. माणसाने सतत बोलत राहावे. कवितेचे लोकगीत झाले की त्यासारखा आनंद नाही. अजूनही आपले मूलभूत प्रश्न सुटू शकले नाहीत त्याबद्दल अस्वस्थता व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना किसन चव्हाण म्हणाले, त्यागाच्या वाटा निवडण्याची गरज आहे. संविधानाची अंमलबजावणी करणारे हात प्रामाणिक नाहीत. देशांतर, धर्मांतर व नामांतर असे पर्याय समोर असताना धर्मांतराचा पर्याय स्वीकारला. बाबासाहेबांनी डोक्यावरील पाटी घालून हाती शिक्षणाची पाटी दिली. बाबासाहेबांची वाटच समाजात परिवर्तन घडून आणील असा विश्वास व्यक्त केला. नाही रे वर्गासाठी लढाई करावी लागेल. संविधान राहिले तरच आपला विश्वास राहील असे मत व्यक्त केले.  किसन चव्हाण यांना दिनकर साळवे सन्मानार्थ देण्यात आलेला पुरस्कार सन्मानचिन्ह, पाच हजार रुपये रोख, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. प्रास्ताविक के. जी. भालेराव यांनी केले. स्वागत सूर्यकांत शिंदे यांनी केले तर आभार बंटी यादव यांनी मांडले. मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन साळवे विनोद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्रा. डॉ. मिलिंद कसबे, प्रा. राहुल हांडे, प्रकाश पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Visits: 135 Today: 2 Total: 1416066

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *