दोन बिबट्यांच्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यू

दोन बिबट्यांच्या झुंजीत एका बिबट्याचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेळकेवाडी येथे दोन बिबट्यांच्या झालेल्या झुंजीमध्ये एका साडेतीन वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना बुधवारी (ता.19) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथील शांतीलाल पन्नालाल गोळवा यांची उसाची शेती आहे. बुधवारी त्यांच्या उसाच्या शेतामध्ये साडेतीन वर्षीय बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. त्यामुळे या घटनेची माहिती सुधीर वाघ यांनी मोबाईलवरुन वन विभागाचे वनसेवक बाळासाहेब वैराळ यांना दिली. सदर माहिती वैराळ यांनी वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांना दिली. माहिती मिळताच थेटे यांच्यासह वनरक्षक सविता थोरात, वैराळ व रोहिदास भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन बिबट्यांमध्ये झुंज होवून एका बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे वन विभागाचे अधिकारी थेटे यांनी सांगितले. त्यानंतर मृत बिबट्याला शवविच्छेदन करण्यासाठी सरकारी वाहनातून चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले. दरम्यान पठारभागात यापूर्वीही अशाच पद्धतीने बिबट्यांच्या झुंजी होवून बिबट्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Visits: 164 Today: 1 Total: 1962336

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *