फ्लेक्स प्रभू रामाचा अन् फोटो अजितदादांच्या आमदाराचा! चर्चा होताच माजी महिला आमदारांनी कार्यकर्त्यांना दिली तंबी


नायक वृत्तसेवा, शिर्डी
२२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे. यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. काही नेते विविध ठिकाणी फ्लेक्स लावून या सोहळ्यासाठी आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देत आहे. परंतु अनेक फ्लेक्सवर प्रभू श्रीराम आणि संत-महंतांच्या फोटोपेक्षा नेत्यांचे फोटो मोठे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे फ्लेक्स छापताना माझा फोटो फ्लेक्सवर छापू नये आणि संत-महंतांचे फोटो टाकावे अशी तंबीच आपल्या कार्यकर्त्यांना एका सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जय श्रीराम.. नम्र विनंती.. नमस्कार.. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या प्रभू श्रीराम मंदिर सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने कुठेही फ्लेक्स लावताना माझा फोटो त्यावर वापरू नये ही नम्र विनंती. कारण आपण सर्वच जण प्रभू रामभक्त म्हणून हा सोहळा साजरा करतो आहोत त्यात राजकीय पक्ष चिन्ह या व्यतिरिक्त असणारा हा आनंदोत्सव आपण रामभक्त म्हणून साजरा करीत असताना आपले फोटो वापरण्याऐवजी साधू, संत, महंत आणि कारसेवकांच्या फोटोचा वापर करून धार्मिक उत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करूयात. केवळ प्रभू श्रीराम यांचाच फोटो सर्वत्र सर्व फलकावर असणे उचित ठरेल. आपल्या अस्मितेचा भावभक्तीचा हा राम मंदिर सोहळा मोठ्या आनंदाने, भक्तीभावाने, गुण्यागोविंदाने साजरा करूया हे नम्र आवाहन.. जय श्रीराम. अशाप्रकारचा आशय त्यांनी पोस्ट केलाय.

कोपरगाव शहरात अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात अनेक कार्यक्रमावेळी फ्लेक्स वॉर पाहायला मिळतो. आमदार काळे अयोध्याला जाणार्‍या संत-महंतांची मिरवणूक काढून पूजन करणार आहे. त्या कार्यक्रमाचे अनेक फलक शहरात लागले असून त्यावर आमदार काळेंचा मोठा फोटो आहे. काळेंनी लावलेल्या फ्लेक्सवर संतांचे फोटो नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आमदार काळे यांच्या फ्लेक्सवर टीका करत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की ‘तुम्ही कर्तृत्ववान असालही.. पण धार्मिक क्षेत्रात ज्यांच्या योगदानापुढे त्यांचे भक्त नतमस्तक होतात. त्यांची तुम्ही शोभायात्रा काढणार आहात. त्या कोपरगाव तालुक्यातील संत-महंतांचे फोटो कुठे व कुठल्या मार्गावर लावून त्यांचा गौरव केला काय? असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यानंतर माजी आमदार कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केल्याने मोठी चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *