कुटुंबावर संकट असतानाही मंत्री शंकरराव गडाख उतरले मैदानात नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कसली कंबर; सुविधांबाबत प्रशासनाला केल्या सूचना
नायक वृत्तसेवा, नेवासा
कुटुंबावर कोरोना संसर्गाचे संकट असताना त्यातून सावरत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील आरोग्यासाठी कंबर कसली आहे. दोन दिवसात शनैश्वर ग्रामीण रुग्णालयात 100 बेडची सुविधा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, बंधू प्रशांतसह कुटुंबातील चार सदस्य कोरोनावर उपचार घेत आहेत.
मंत्री गडाख मागील पंधरवड्यात कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मात्र हा सारा ताणतणाव बाजूला ठेवत गडाख यांनी भक्तनिवास येथील कोरोना सेंटर, शनैश्वर रुग्णालय व चिलेखनवाडी येथील लोचनाबाई ऑक्सिजन प्रकल्पास भेट देवून आरोग्याचा श्वाशत प्रश्न मार्गी लावला आहे.
शनैश्वर रुग्णालयात सध्या 60 बेड आहेत. येथे अधिक 40 बेडची व्यवस्था दोन दिवसांत होणार आहे. यात आठ अतिदक्षता व 40 ऑक्सिजन बेड असणार आहे. रुग्णांना औषधे, ऑक्सिजन, चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली. नेवासा व घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व देवस्थानचे सर्व कर्मचारी 24 तास मदतीचा हातभार लावणार आहे.
या बैठकीस प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, देवस्थान अध्यक्ष भागवत बानकर, रुग्णालय व्यवस्थापक संजय बानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश आघाव उपस्थित होते. तांत्रिक अधिकारी नितीन शेटे यांनी सद्यस्थिती व आवश्यक बाबींची माहिती दिली.
आरोग्याचा विषय घाईघाईत घेणे योग्य नाही. जे करायचे ते उत्तम केले तरच त्याचा लाभ रुग्णास होतो, हे लक्षात घेवून शनैश्वर रुग्णालयासह कोविड सेंटर व सर्व आरोग्य यंत्रणेतील अडचणी लक्षात घेवून नियोजन केले आहे. ‘माझा तालुका माझे घर’ समजून प्रयत्न सुरू आहे.
– शंकरराव गडाख (मृदा व जलसंधारण मंत्री)