सतरा पोलीस निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षकांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या! पोलीस अधीक्षकांचे आदेश; दराडे कोतवालीत, पाटील अकोल्यात, तर सोनवणे आश्वीत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार खमका पोलीस अधिकारी म्हणून राहुरीत गाजलेल्या प्रताप दराडे यांना कोतवालीचा पदभार देण्यात आला आहे. राहुरीच्या संजय सोनवणे यांना आश्वीत तर बेलवंडीच्या संजय ठेंगे यांना राहुरीत नियुक्ति देण्यात आली आहे. अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांना जिल्हा विशेष शाखेत बोलावण्यात आले असून त्यांच्या जागी शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक गुलाबराव पाटील, तर शेवगावचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांच्यावर राजूर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बजावलेल्या आदेशानुसार पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांना आर्थिक गुन्हे शाखेचा भार देण्यात आला आहे. सुप्याच्या ज्योती गडकरी यांना नियंत्रण कक्षात पाचारण करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अरुण आव्हाड आता सुपा ठाण्याचे निरीक्षक असतील. मुख्यालयातील मानवसंसाधन विभागाचे निरीक्षक अशोक भवड यांना शनीशिंगणापूर तर आश्वीच्या संतोष भंडारे यांना बेलवंडीला धाडण्यात आले आहे.
जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या आनंदा कोकरे यांना तोफखाना, नितीन देशमुख यांना श्रीरामपूर शहर व सतीश घोटेकर यांना मानवसंसाधन विभाग देण्यात आला आहे. तर बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या समीर बारावकर यांच्याकडे पारनेर, संदीप कोळी यांच्याकडे कोपरगाव तालुका व रामकृष्ण कुंभार यांच्याकडे शिर्डी पोलीस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धुळ्याहून बदली होवून मुख्यालयात रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून नियुक्ति देण्यात आली आहे.
याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या सात अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेशही काढण्यात आले आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्यातील योगेश राजगुरु यांना भिंगार कॅम्प, सोनई पोलीस ठाण्याचे माणिक चौधरी एमआयडीसी, शेवगावचे आशिष शेळके सोनईत, राहात्याचे कैलास वाघ लोणीत, लोणीचे युवराज आठरे सायबर सेल विभागाततर सोनईचे रामचंद्र करपे यांना अहमदनगरच्या भरोसा सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. याशिवाय येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातून बाहेर जाणार्या अधिकार्यांच्याही बदल्या केल्या जाणार आहेत.