खंदरमाळमध्ये आगळावेगळा तुलसी विवाह संपन्न काकडा भजनाची सांगता करुन भाविकांना महाप्रसादाचे वाटप
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ येथे मंगळवारी (ता.8) सकाळी आगळा वेगळा तुलसी विवाह पार पडला. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजनंतर तुलसी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व असते. ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने तुलसी विवाह संपन्न होतात. मात्र, खंदरमाळ येथील विवाहाची ख्याती असल्याने दरवर्षी येथे आगळावेगळा तुलसी विवाह होत असतो. यंदा देखील हा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
खंदरमाळ येथील हनुमान मंदिरात अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत रमेश महाराज कजबे यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळ व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यने पहाटे तीन वाजल्यापासून काकडा भजन होवून आरतीचा कार्यक्रम होतो असा नित्यक्रम असतो. त्यानंतर तुलसी विवाह होवून काकड्याची सांगता करण्यासाठी भाविक पंढरपूरला रवाना होतात, तेथे चंद्रभागा नदीत स्नान करुन काकडा अर्पण करतात. ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे.
आज हा तुलसी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व त्यांची पत्नी प्रीती या आवर्जुन उपस्थित होत्या. तसेच पंचक्रोशीतील भाविक, वारकरी व नागरिक उपस्थित होते. तुलसी विवाह झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, विवाहनिमित्त अनेक भाविकांनी देवाला आहेरही केला. या आगळ्यावेगळ्या तुलसी विवाहाची ख्याती दिवसेंदिवस पंचक्रोशीच नव्हे तर जिल्हाभर पोहोचत आहे.