खासदार विखेंच्या विरोधात ‘तनपुरे’चे कामगार रस्त्यावर कारखान्याचे अध्यक्ष ढोकणेंचा प्रस्ताव संतप्त कामगारांनी धुडकावला

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना आता विखेंच्या ताब्यात आहेत. या कारखान्यातील दोनशे कामगार थकीत वेतन व इतर 25 कोटी 36 लाख रुपयांच्या मागणीसाठी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. सोमवारी (ता.30) आंदोलनाचा सातवा दिवस होता.

कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी सोमवारी सकाळी कामगारांची भेट घेऊन, लेखी प्रस्ताव दिला. त्यात जर-तरची भाषा होती. त्यामुळे संतप्त कामगारांनी प्रस्ताव धुडकावला. आणि कामगारांनी दुपारी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर एक तास रास्ता रोको करून, कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाचा कामगारांनी निषेध केला. रिपाई (आठवले गट) व शिवसेनेने रास्ता रोकोमध्ये भाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, तोडगा काढला नाही तर खासदार डॉ. विखे यांच्या घरावर मोर्चा काढू. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार विखे एकाच माळेचे मणी आहेत. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, विखेंनी केवळ पैसा खाण्यासाठी व खासदारकी मिळविण्यासाठी कारखाना ताब्यात घेतला. कामगारांना वार्‍यावर सोडले. उद्यापासून विविध संघटना कामगारांसाठी संघर्ष करतील, असा इशारा रिपाईचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, तुषार दिवे, शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे, संतोष चोळके, भागवत मुंगसे, कुमार भिंगारे, ज्ञानेश्वर भागवत आदिंनी दिला.

Visits: 114 Today: 1 Total: 1110498

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *