जिल्ह्यातील एैंशी पोलीस अधिकार्‍यांच्या परिक्षेत्रात बदल्या! निवडणूक आयोगाचे आदेश; शिर्डी, अकोले, श्रीरामपूरसह कोपरगाव तालुक्याचे निरीक्षकही जिल्ह्याबाहेर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील सेवेची मुदत पूर्ण करणार्‍या अधिकार्‍यांच्या परिक्षेत्रात बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी जिल्ह्यातील तेरा पोलीस निरीक्षकांसह ८२ पोलीस अधिकार्‍यांना बदलीच्या पसंदीची तीन ठिकाणे सूचवण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यात रुळलेल्या बहुतेक पोलीस अधिकार्‍यांच्या जागेवर जिल्ह्याबाहेरुन आलेल्या अधिकार्‍यांची ‘थेट’ वर्णी लागणार आहे. एकीकडे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळलेली असताना दुसरीकडे जिल्ह्यात नव्याने दाखल होणार्‍या अधिकार्‍यांचा भरणा होणार असल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांची डोकेदुखीही वाढणार आहे. मात्र त्याचवेळी नंदकुमार दुधाळ, प्रताप दराडे, नितीन चव्हाण यांसारख्या ‘खमक्या’ पोलीस निरीक्षकांना दीर्घकाळ नियंत्रण कक्षात थिजवण्याबाबतही साशंकता आहे.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यात आपला कार्यकाळ पूर्ण करणार्‍या १३ पोलीस निरीक्षकांसह ३५ सहायक पोलीस निरीक्षक व ३४ पोलीस उपनिरीक्षकांना नाशिक परिक्षेत्रांतंर्गत पसंदीची तीन ठिकाणे लिखीत स्वरुपात कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रक्रियेतून शिर्डीचे निरीक्षक सोपान शिरसाठ, कोतवालीचे चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे मधुकर साळवे, पारनेरचे संभाजी गायकवाड, सुप्याच्या ज्योती गडकरी, श्रीरामपूर शहरचे हर्षवर्धन गवळी, कोपरगाव तालुक्याचे वासुदेव देसले, अकोल्याचे विजय करे व कर्जतचे घनश्याम बळप या ठाणे प्रभार्‍यांसह नियंत्रण कक्षातील संजय सानप, विलास पुजारी, शिवाजी डोईफोडे व आर्थिक गुन्हे शाखेचे सुहास चव्हाण यांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार आहे.

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावणार्‍या ३५ सहायक पोलीस निरीक्षकांचाही जिल्ह्याबाहेरील बदल्यांमध्ये समावेश असून त्यात स्वतंत्र प्रभार सांभाळणार्‍या औद्योगिक वसाहतीचे राजेंद्र सानप, शनिशिंगणापूरचे रामचंद्र करपे यांच्यासह व राजूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण दातरे यांचाही समावेश आहे. काही गुन्ह्यांच्या तपासात अतुलनीय कामगिरी बजावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत थोरातही परिक्षेत्रात बदलून जाणार आहेत. जामखेड, मिरजगाव, राहुरी, लोणी, कोपरगाव शहर, शिर्डी (वाहतूक), भिंगार कॅम्प, कोतवाली, तोफखाना, नगर तालुका, पारनेर, नेवासा, पाथर्डी, खर्डा, श्रीरामपूर, शिर्डी, शेवगाव या पोलीस ठाण्यांमधील दुय्यम अधिकार्‍यांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्यातील ३४ पोलीस उपनिरीक्षकही जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. त्यात काही प्रकरणात ठळकपणे समोर आलेले गुन्हे शाखेचे तुषार धाकराव, सोपान गोरे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक निकिता महाले यांचाही बदल्यांमध्ये समावेश आहे. या सर्वांना नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये पसंदीचे तीन ठिकाणे सूचविण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांकडे याबाबतचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक ते अंतिम करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी बाहेर जावून त्यांच्याजागी नव्याने अधिकारी रुजू होणार असल्याने शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

एकीकडे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, नगरी यंत्रणेचा धुमाकूळ आणि वाढत चाललेला गुन्हेगारी आलेख यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नाजूक असताना दुसरीकडे जिल्ह्यात रुळलेले ८२ अधिकारी जिल्ह्याबाहेर जाणार असल्याने पोलीस अधीक्षकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. अशातच गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणारे मात्र अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलेले शिर्डीचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ आणि राहुरीचे निरीक्षक प्रताप दराडे यांना नियंत्रण कक्षात थिजवत ठेवण्यामागचे कारण मात्र आजही अनाकलनीय आहे. पूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धडाकेबाज कारकीर्द गाजवणारे नितीन चव्हाण जिल्ह्यात परतून काही महिने झाले आहेत, मात्र त्यांनाही नियंत्रणातच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्यही व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *