पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे आरोग्यसेवा पूर्ववत झाल्याचा संदेश! मात्र कोरोना लस घेण्यास कोणीही धजेना; लसीकरणात भाग घेण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यात राष्ट्रीय लसीकरण दिनी रविवारी (ता.31) पाच वर्षांखालील बालकांचे पोलिओ लसीकरण उत्साहात पार पडले. राहुरी तालुक्यात नोंदविलेल्या 25 हजार 202 लाभार्थी बालकांपैकी 24 हजार 284 (96.35 टक्के) बालकांना दिवसभरात पोलिओ डोस पाजण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपाली गायकवाड यांनी दिली. शासनाचे आरोग्य कर्मचारी कोरोना सेवेत गुंतल्याने मागील 10 महिन्यांपासून इतर शासकीय आरोग्य सेवा ठप्प झाली होती. पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे आरोग्यसेवा पूर्ववत झाल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, गुहा, मांजरी, टाकळीमियाँ, उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 178 बूथद्वारे 473 आरोग्य कर्मचारी व 38 पर्यवेक्षकांच्या पथकाने पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी केली. दरम्यान, तालुक्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा 28 जानेवारीपासून सुरू झाला. त्यात शासकीय, खासगी डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यासाठी नोंदविलेल्या 1509 पैकी अवघ्या 146 (9.67 टक्के) लाभार्थींनीच लस घेतली. पुरेसे डोस आलेले असतानाही कर्मचारी ती घेण्यास धजावत नाहीत. कोरोना लस नको रे बाबा, अशी त्यांची मानसिकता झालेली दिसते. आपल्याला दुष्परिणाम होतो की काय अशी त्यांना भीती आहे. मात्र, जेवढ्या लोकांनी लस घेतली त्यांना कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. ही पूर्णपणे सुरक्षित असल्याचे डॉक्टर आणि सरकार सांगते आहे. तरीही मानसिकता बदलताना दिसत नाही.
राहुरी ग्रामीण रुग्णालयात लाभार्थींना कोरोना लस दिली जात आहे. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून, तालुक्यात लसीकरण झालेल्या कोणत्याही लाभार्थींवर दुष्परिणाम आढळला नाही. त्यामुळे लाभार्थींनी कोरोना लसीकरणात भाग घ्यावा.
-डॉ.दीपाली गायकवाड (तालुका आरोग्य अधिकारी)