उत्तरेला वरदान ठरलेले भंडारदरा धरण अखेर ओव्हरफ्लो! सायंकाळी सहा वाजता गाठली सर्वोच्च पातळी; लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण..


नायक वृत्तसेवा, अकोले
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा पावसाच्या लहरी स्वभावाचा फटका लाभक्षेत्रासह धरणांच्या पाणलोटालाही बसला असून ऑगस्टचा शेवटचा आठवडा उलटत असतांना समाधानकारक पाणीसाठा असूनही जिल्ह्यातील एकही मोठे धरण अद्याप भरले नव्हते. मात्र गेल्या 48 तासांपासून काही प्रमाणात वाढलेल्या पावसाने जिल्ह्यातील मोठ्या क्षमतेच्या तीन धरणांमध्ये सर्वप्रथम तुडूंब होण्याचा मान यंदाही भंडारदर्‍यालाच दिला आहे. आज सकाळी धरणाचा पाणीसाठा 99.41 टक्के होता, मात्र त्याचवेळी पाऊसही थांबल्याने आजच धरण भरण्याबाबत साशंकता होती, मात्र दिवसभरात धरणात 100 दशलक्ष घनफूटाची आवक झाल्याने सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाने आपली 11 हजार 39 दशलक्ष घनफूटाची पातळी गाठली आहे.


यावर्षी संपूर्ण राज्याला वातावरणीय बदलाचा मोठा फटका बसला असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात खडखडाट असल्यागत स्थिती आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेतील काही तालुक्यांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्हाही त्याला अपवाद राहीलेला नाही. एकीकडे जिल्ह्यातील बहुतेक धरणांच्या पाणलोटात रडतखडत कोसळलेल्या पावसाने उशिराने का होईना पण समाधान निर्माण केलेले असतांना, दुसरीकडे निम्मा पावसाळा संपूनही लाभक्षेत्रात मात्र अद्यापही दमदार पाऊसच नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा स्थितीत भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरुन नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहणे अपेक्षीत असतांना भर पावसाळ्यात उभी पीकं वाचवण्यासाठी धरणातून आवर्तन सोडण्याची वेळ आली आहे.


लाभक्षेत्रात चिंताजनक स्थिती असतांना धरणांच्या पाणलोटातही यंदा पावसाचा सुकाळ अनुभवायला मिळाला नाही. अचानक दोन-चार दिवस जोरदार कोसळणार्‍या सरी, तर अचानक लख्ख सूर्यप्रकाश अशा विचित्र स्थितीत उत्तर नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे व आढळा सारख्या हजारोंच्या पोटपाण्याचा स्रोत असलेल्या धरणात धिम्यागतीने मात्र समाधानकारक पाण्याची आवक झाली. सद्यस्थितीत लाभक्षेत्राप्रमाणेच पाणलोटातही ऊन-सावलीचा खेळ सुरु असून अधुनमधून कोसळणारी एखादी श्रावणसर वगळता पाऊस थांबला आहे. त्यामुळे विद्युतगृह वगळता भंडारदर्‍याचा विसर्ग थांबवण्यात आला तर, निळवंडेतून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. असे असतांनाही भंडारदर्‍यालाही यंदा सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली असून तो क्षण अखेर आज (ता.25) सायंकाळी उगवला.


गेल्या 48 तासांपासून काहीसा जोर वाढलेल्या पावसाचे भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तांडव रंगल्याने सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवरुन होणारा पाण्याचा खळखळाट वाढला होता. त्यामुळे रडतखडत क्षमतेच्या दिशेने जात असलेल्या भंडारदर्‍यातील पाण्याची आवकही वाढली. गेल्या 36 तासांत धरणात 315 दशलक्ष घनफूट पाण्याची भर पडली आहे. त्यातील 106 दशलक्ष घनफूट पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरण्यात आले असून 209 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा करण्यात आल्याने आज (ता.25) सायंकाळी 6 वाजता धरणाचा पाणीसाठा 11 हजार 39 दशलक्ष घनफूटावर (100 टक्के) पोहोचला आहे. या सुवार्तेने दुष्काळाचा सामना करणार्‍या लाभक्षेत्रात काहीसा आनंद निर्माण झाला आहे.


गेल्या 48 तासांत काहीप्रमाणात पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवकही झाली आहे. मात्र आज सकाळपासून पाणलोटातील पाऊस जवळजवळ थांबला आहे. यावर्षी झालेल्या पावसाला साधारणतः दुपारनंतरच जोर चढतो असा अनुभव आहे, तसे घडल्यास आज रात्रीपर्यंत भंडारदरा धरण ओव्हर फ्लो होईल. मात्र सद्यस्थिती कायम राहील्यास त्यासाठी उद्या सकाळपर्यंत वाट पहावी लागेल. भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
अभिजीत देशमुख
शाखा अभियंता : भंडारदरा धरण, शेंडी


आज सकाळी 6 वाजता संपलेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस – रतनवाडी 66 मि.मी., घाटघर 48 मि.मी., पांजरे 40 मि.मी., भंडारदरा 36 मि.मी., वाकी 17 मि.मी., निळवंडे 03 मि.मी. व अकोले 01 मि.मी., पाणीसाठे : भंडारदरा 11 हजार 39 दशलक्ष घनफूट (100 टक्के), निळवंडे 6 हजार 828 दशलक्ष घनफूट (81.99 टक्के) व आढळा 909 दशलक्ष घनफूट (85.75 टक्के).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *