टाकळीमियाँ पंचक्रोशीत उभ्या पिकांचे मोठे नुकसान भरपाईची मागणी; अन्यथा स्वाभिमानीकडून आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील टाकळीमियाँ व पंचक्रोशीत सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने या भागातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रत्येक शेतकर्याला एकरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी. अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

या भागातील टाकळीमियाँ, मोरवाडी, मुसळवाडी, लाख, जातप, त्रिंबकपूर, करजगाव या भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके तर घास, मका, गिन्नी गवत अशी चारा पिके केलेली आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून दररोज सातत्याने पाऊस कोसळत आहे. या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिके शेतात पाणी साचून राहिल्यामुळे सडू लागली आहेत. वेळोवेळी बदलल्या वातावरणामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडे, अळी अशा रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून पिके वाचवली. मात्र, आता पावसाने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतात साचून राहिलेल्या या पाण्याचा निचरा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पिके आता सडू लागली आहेत. मात्र, सरकार किंवा कृषी विभाग याची दखल घेताना दिसत नाही. अद्याप या भागाचे लोकप्रतिनिधी या भागात फिरकलेही नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकर्यांना एकरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांनी बुधवारी (ता.10) बाळासाहेब निमसे, सतीश निमसे, लताबाई मगर, अनिल निमसे, भाऊसाहेब बोबडे, ज्ञानदेव मगर, दत्तात्रय मगर, नागू निमसे, अमोल निमसे, संजय करपे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली.
