निकालानंतर सत्यजीत तांबेच्या राजकीय भूमिकेची चर्चा! विक्रमी मताधिक्क्य मिळण्याची शक्यता; मतदारसंघातील नगरची 45 टक्के मते निर्णायक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्याच्या नजरा खिळवून ठेवणार्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निकाल अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. पक्षाने वडिलांना उमेदवारी देवूनही पुत्राकडून अपक्ष उमेदवारी, निवडणुकीनंतर आपण पक्षाचाच अर्ज दाखल केल्याचा दावा, भूमिपुत्राच्या मुद्द्यावरुन जागृत झालेल्या जाणीवा, भाजपाची संशयास्पद भूमिका आणि प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत पदवीधर आणि शिक्षकांचा निरुत्साह या भोवती फिरलेल्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणार्या सत्यजीत तांबे यांच्यासह त्यांचे मामा व काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. नाशिक व नगर जिल्ह्याचा एकूण झालेल्या मतदानातील 70 टक्के वाटा या निवडणुकीत तांबेंना विक्रमी मताधिक्क्य मिळवून देणारा ठरेल असे अंदाज असले तरीही आमदार झाल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल याबाबत मात्र अजूनही वेगवेगळ्या राजकीय चर्चांचे धुमारे फुटत आहेत.

विविध राजकीय आणि नाट्यमय घडामोडींची भरमार असलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवारी (ता.2) नाशिकमध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून रात्रीपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अहमदनगरसह नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण 2 लाख 62 हजार 678 पदवीधर व शिक्षक मतदारांमधील अवघ्या 1 लाख 29 हजार 456 (49.28 टक्के) मतदारांनीच सोमवारी आपला हक्क बजावला. त्यामुळे ज्या उमेदवाराला पहिल्या पसंदीची 64 हजार 728 मते मिळतील त्याला विजयी घोषित केले जाईल किंवा तसे न घडल्यास दुसर्या पसंदीक्रमानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक नायकने 10 जानेवारी रोजी ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे भाजपाचे उमेदवार’ या मथळ्याखाली राज्यातील पहिलेच वृत्त प्रसिद्ध करुन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर काँग्रेसनेही प्रत्येक गोष्टीची चाचपणी करुनच पावलं टाकल्याने प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या काहीतास अगोदरपर्यंत काँग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्कंठा ताणली गेली. ऐनवेळी पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली, मात्र त्यांनी आपला अर्ज दाखल न करता आपले सुपुत्र सत्यजीत यांचा अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे तांबे भाजपाच्या वळचणीला गेल्याचे सांगितले जावू लागले.

त्यानंतरच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत याच विषयावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपा कोणत्याही क्षणी सत्यजीत तांबे यांना पाठींबा जाहीर करील अशाही चर्चा रंगात आल्या. मात्र ना डॉ. सुधीर तांबे, ना सत्यजीत तांबे यापैकी कोणीही आपण भाजपाकडून पाठिंबा मागत असल्याचे उघड वक्तव्य केले नाही. त्यामुळे सत्यजीत तांबेंच्या भरवशावर आपल्या दोन्ही उमेदवारांना माघार घ्यायला लावणार्या भाजपाचा कोंबडा झाला की काय अशीही चर्चा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर झाली. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकर्त्यांना बहाल केले आणि लागलीच त्याचे पडसाद नगर जिल्ह्यात उमटले.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि नगर दक्षिणचे भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘भूमिपुत्रा’चा विषय समोर आणून सत्यजीत तांबे यांना उघड पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन त्यांच्या मंत्री असलेल्या वडिलांनीही केल्याने यामागे भाजप तर नाही? अशाही शंका समोर आल्या. खरेतर डॉ. विखे यांच्या ‘भूमिपुत्र’ या वक्तव्यानंतर धुळे, जळगाव व नंदूरबारमध्येही हाच विषय समोर आला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात मतविभाजन होवून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मतदारांनी पसंदी दिल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. विखे यांनी सत्यजीत तांबेंना रसद देण्याचा प्रयत्न केला की रसद तोडण्याचा अशाही चर्चा झडल्या.

प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदार असलेल्या या पाचही जिल्ह्यातील निरुत्साह देखील समोर आला. त्यातून प्रस्थापितांना धक्का लागणार नसल्याचे अंदाजही वर्तविले गेले. त्यानुसार भूमिपुत्राच्या मुद्द्यावरुन मतविभाजन झाले तरीही संपूर्ण मतदारसंघातील एकूण मतदानात धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील मतदान केलेल्यांची संख्या अवघी 39 हजार 240 (30 टक्के) इतकीच असल्याचे समोर आले. याच शब्दावर निवडणूक केंद्रीत झाल्याचे समजल्यास एकट्या नगर जिल्ह्यातून 58 हजार 283 (50.40 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला, तर नाशिकमधूनही 31 हजार 933 (45.85 टक्के) मतदारांनी मतदान केले. नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यातून झालेल्या एकूण मतदानाची आकडेमोड पाहता ती तब्बल 90 हजार 216 (69.69 टक्के) इतकी आहे.

तांबे परिवाराने गेल्या तेरा वर्षात या पाचही जिल्ह्यात आपला ऋणानुबंध निर्माण केला आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातही तांबे नावाचा मोठा दबदबा असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. एसएमबीटी रुग्णालयाच्या माध्यमातून नाशिकमध्ये झालेले काम तांबेंसाठी जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेले 90 हजार मतदान तांबे यांच्या बाजूला अधिक झुकणारे असल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत. उर्वरीत तीन जिल्ह्यातील दहा टक्के मते मिळवण्यात त्यांनी यश मिळवल्यास सत्यजीत तांबे हे 40 हजारांहून अधिक मतांनी निवडून येतील असाही अंदाज वर्तविला जात आहे.

मात्र, शेवटी प्रश्न राहतोच तो निवडून आल्यानंतर त्यांच्या भूमिकेचा. याबाबत मात्र अजूनही कोणतीच स्पष्टता समोर आलेली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दाव्यानुसार पक्षाने कोरा एबी फॉर्म दिल्याचे सांगितले गेले, तर सत्यजीत तांबे यांनी त्यांचा दावा खोडून काढला. यात खरे कोण? हा संशोधनाचा विषय असला तरी त्यातून शंका मात्र निर्माण झाली आहे. त्यातच येत्या 5 फेब्रुवारी रोजी माजी मंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात संगमनेरातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदीर्घ कालावधीनंतर माध्यमांसमोर येणार आहेत. यावेळी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय? हे जोपर्यंत समोर येणार नाही, तोपर्यंत सत्यजीत तांबे यांची निवडणुकीनंतरची भूमिका स्पष्ट होवू शकणार नाही.

ज्याअर्थी बाळासाहेब थोरात यांनी सार्वजनिक मंचावर येण्याचा निर्णय घेतला आहे, त्याअर्थी कदाचित निवडून आल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द होवून त्यांची ‘घरवापसी’ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. तर राजकीय जाणकारांच्या एका गटाकडून पुढील काही कालावधीसाठी सत्यजीत तांबे अपक्ष आमदार म्हणूनच वावरतील असाही दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र या जर-तरच्या गोष्टी असून जोपर्यंत निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका समोर येत नाही तोपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघावर जमा झालेले राजकीय चर्चांचे हे ढग निवळण्याची सूतराम शक्यता नाही हेच खरे.

