पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व जगातील उत्तुंग व्यक्तीमत्व ः कर्डिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व जगातील उत्तुंग व्यक्तीमत्व ः कर्डिले
देवळाली प्रवरा येथे कोविड हेल्थ सेंटरचा शुभारंभ व रक्तदान शिबीर
नायक वृत्तसेवा, राहुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व जगातील उत्तुंग व्यक्तीमत्व आहेत. मागील सहा वर्षांत त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून देशहिताचे निर्णय घेतले. खर्या अर्थाने सामान्य जनतेसाठी विविध योजनांद्वारे मोठे काम उभारले. त्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सेवा सप्ताहद्वारे समाजहिताची कामे करून, शुभेच्छा दिल्या जात आहेत, असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

गुरुवारी (ता.17) देवळाली प्रवरा येथे नगरपालिकेच्या पुढाकाराने खासगी डॉक्टरांनी संचलित केलेल्या कोविड हेल्थ सेंटर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व डॉ.तनपुरे कारखान्यावर 350 नारळ रोपांचे वृक्षारोपण प्रसंगी राहुरी कारखाना येथे आयोजित मेळाव्यात कर्डिले बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना कर्डिले म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकारचे व्यवस्थापन नियोजन शून्य आहे. कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. सामान्य जनतेला व्यवस्थित आरोग्य सेवा मिळत नाही. तालुक्यात बारा लाख टन ऊस उभा आहे. राहुरी कारखाना चालू होणार नसता तर, जिल्ह्यातील कारखान्यांनी कवडीमोल भावात ऊस लुटला असता. त्यामुळे शेतकरी व कामगार हितासाठी बंद पडलेला राहुरी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून जिल्हा बँकेतर्फे मदत केली. खासदार डॉ.सुजय विखे यांच्या सहकार्याने पुढील पंचवार्षिकमध्ये कारखाना कर्जमुक्त करु. कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ असेही कर्डिले यांनी सांगितले. शेवटी सुरेश थोरात यांनी आभार मानले.

