बिरेवाडीतून चोरट्यांनी लांबवल्या दोन गायी
बिरेवाडीतून चोरट्यांनी लांबवल्या दोन गाया
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी येथील नवनाथ रंगनाथ ढेंबरे या पशुपालकाच्या दोन जर्शी गायी चोरट्यांनी गोठ्यातून लांबविल्याची घटना सोमवारी (ता.19) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बिरेवाडी येथील पशुपालक नवनाथ ढेंबरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दोन गाया घरापासून काही अंतरावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधल्या होत्या. आणि त्यास बाहेरून कुलूप लावले होते. त्यातच सोमवारी मध्यरात्रीनंतर पावस सुरू झाल्याने वीजही गेली होती. याचाच फायदा उठवत चोरट्यांनी शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन्ही जर्शी गाया चोरून तेथून पोबारा केला. पहाटे चार वाजता पशुपालक ढेंबरे यांचे बंधू शेडकडे गेले असता तर त्यांना शेडमध्ये गाया दिसल्या नाही. त्यामुळे ते घाबरून गेले आणि त्यांनी गोठ्यात गाया नसल्याचे भाऊ नवनाथ यांना सांगितले. हे ऐकून तेही पुरते घाबरून गेले. तात्काळ त्यांनी आजुबाजूला व परिसरात गायींचा शोध घेतला. मात्र कुठेच सापडल्या नाहीत. अखेर घारगाव पोलीस ठाणे गाठत ढेंबरे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातच चोरटे आता पाळीव जनावरांना लक्ष्य करत असल्याने शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.