आठ दिवसांत संगमनेरातील सिग्नल कार्यान्वित होणार! दैनिक नायकच्या वृत्ताचा ‘इफेक्ट’; पोलीस निरीक्षकांनीही दर्शवली सहमती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात सर्वसामान्यांच्या करांमधून मिळालेल्या पैशांची सत्ताधार्‍यांकडून वारेमाप उधळपट्टी करण्यात आली. पालिकेच्या सगळ्याच विभागांमध्ये ठेकेदारी बोकाळल्याने केवळ निविदा आणि त्यातून जनतेच्या पैशांची लुट हे एकच सूत्र पद्धतशीर राबवण्यात आले. एकामागून एक झालेल्या अशा अनेक नियोजनशून्य कामांमधून ठेकेदारांची पोटं भरली गेली. पालिका पदाधिकार्‍यांच्या अनागोंदी कारभाराचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून शहराच्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून उभी असलेली निष्क्रिय सिग्नल यंत्रणा त्याचीच साक्ष देत होती. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दैनिक नायकने पालिकेच्या अनागोंदीची लक्तरे फाडताना संगमनेरच्या सिग्नल व्यवस्थेचे वास्तव चव्हाट्यावर आणले. त्याची सत्ताधार्‍यांनी दहा वर्षात नाहीतर पालिकेच्या दोन वर्षांच्या प्रशासकांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी अडगळीत गेलेली सिग्नल व्यवस्था दुरुस्त करुन घेतली असून आठवडाभरात त्यावरुन वाहतुकीचे संचलन सुरु होईल. पोलीस निरीक्षकांनीही त्यासाठी सहमती दर्शवल्याने शहराच्या बेशिस्त वाहतुकीला काहीअंशी तरी शिस्त लागण्याची आणखी एक शक्यता निर्माण झाली आहे.

जवळपास दशकभरापूर्वी संगमनेर नगरपालिकेने राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मिळवण्यासाठी तीनबत्ती चौक, बसस्थानक चौक (नवीन नगररोड), हॉटेल काश्मिर, सह्याद्री विद्यालय (जाणता राजा मैदान वळण) आणि अकोले रस्ता (जाजू पेट्रोल पंप) अशा पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असल्याने पालिकेच्या प्रस्तावाला तत्काळ अंतिम मान्यताही प्राप्त झाली आणि संगमनेर नगरपरिषदेला वरील पाच ठिकाणी सिग्नल बसवण्यासाठी ३५ लाखांचा निधीही मंजुर करण्यात आला.

मग काय! पालिकेच्या तिजोरीत पैसा आला की अनेकांच्या हातापायांना खाज सुटत असल्याने तत्काळ निविदा सूचना राबविण्यात आली. तत्पूर्वी पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी सिग्नल व्यवस्थेचे नियमन करणार असलेल्या पोलिसांना विश्वासात घेण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र पैशांची उधळण होईस्तोवर पालिकेला पोलीस आठवलेच नाहीत. ठेकेदारी आणि कटकमीशनच्या नादात पोलिसांच्या अभिप्रायाची जाणीवच झाली नाही. जेव्हा ३५ लाखांचा खर्च करुन यंत्रणा उभी राहिली, तेव्हा मात्र पालिकेला पोलीस आठवले आणि पत्रव्यवहार सुरु झाला. मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने पोलिसांनीही बसवण्यात आलेली यंत्रणा ‘सदोष’ असल्याचे सांगत त्याचे नियमन करण्यास नकार दिला.

सिग्नलचे दिवे आपल्याच राजकारणाला थांबा देतील या भयाने त्यानंतरच्या काळात अगदी गेल्या वर्षीपर्यंत पालिका आणि पोलिसांमध्ये पत्रव्यवहाराचे सत्र सुरु होते. पोलिसांनीही सिग्नलवरुन वाहतुकीचे नियमन करायचे असेल तर उभारलेल्या व्यवस्थेत बदल करण्याची प्रत्येकवेळी सूचना केली. मात्र या विषयावर पालिका पदाधिकार्‍यांची भूमिका सुरुवातीपासून आडमुठीच राहिल्याने पोलिसांनीही सिग्नलवरुन वाहतुकीचे नियमन करण्यास ठामपणे नकार दिला. तेव्हापासून गेली नऊ वर्ष सर्वसामान्य जनतेच्या करातून ३५ लाख रुपये खर्च करीत उभारलेली ही यंत्रणा अक्षरशः धूळखात पडून आहे. मध्यंतरी बसस्थानकाच्या विस्तारीकरणात त्यातील सिग्नलचे दोन खांबही गायब झाल्याने राहीलेले खांबही हळूहळू उदृष्य होतील अशीच स्थिती निर्माण झाली होती.

मात्र आमची बांधिलकी समाजाशी असल्याने, माध्यम म्हणून आमचं कर्तव्य बजावताना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता.१) दैनिक नायकने ‘दशकभरानंतरही संगमनेरची सिग्नल व्यवस्था धुळखात पडून! लाखो रुपयांचा खर्च पाण्यात; ठेकेदार पोसण्यासाठी पालिकेचा अविचारी निर्णय’ अशा ठसठशीत मथळ्याखाली पालिकेतील अनागोंदी कारभाराचे वानगीदाखल पहिले प्रकरण प्रसिद्ध केले. पालिकेच्या प्रशासकांनी त्याची दखल घेत दुसर्‍याच दिवशी (ता.२) पुण्यातील तंत्रज्ञ व्यक्तिकडून तीनबत्ती चौक (दिल्लीनाका) व हॉटेल काश्मिर या दोन ठिकाणची सिग्नल यंत्रणा दुरुस्त करुन घेतली असून त्यांची वेळ कमी-जास्त करण्याबाबत पालिकेच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत संगमनेर शहरातील किमान दोन सिग्नल प्रत्यक्ष सुरु होतील असे अपेक्षित आहे.

याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सिग्नलची दुरुस्ती केल्याचे व लवकरच ते कार्यान्वित करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना नव्याने पत्र देवून वाहनधारकांना शिस्त लागेपर्यंत कर्मचारी देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहने थांबण्याची रेषा आणि झेब्रा क्रॉसिंगबाबत पुण्याच्या एका ठेकेदाराशी बोलणे झाले असून सध्या सुरु असलेले त्याचे काम आटोपल्यानंतर आठ दिवसांत तो सदरील कामे करुन देणार आहे. पोलीस निरीक्षकांनीही वाढलेल्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सिग्नलची गरज मान्य केली. मात्र शहर पोलीस ठाण्यात आधीच जेमतेम मनुष्यबळ, त्यातच वाहतुकीचा ताण यामुळे कसरत होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


सिग्नल सुरु करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असून तातडीने दोन ठिकाणच्या सिग्नलची दुरुस्ती करुन घेतली आहे. मोठ्या वर्दळीचा रस्ता असल्याने सिग्नलजवळ वाहने थांबण्याची रेषा आणि रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आखणे आवश्यक आहे. संबंधित ठेकेदार सध्या अन्य कामात व्यस्त असल्याने पुढील आठवड्यापर्यंत उपलब्ध होईल. अधिक विलंब होत असल्यास पर्याय शोधून लवकरात लवकर दोन ठिकाणचे सिग्नल सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
– राहुल वाघ (मुख्याधिकारी, संगमनेर नगरपरिषद)

संगमनेर शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील वर्दळ खूप मोठी आहे. स्थानिक वाहनांची संख्या आणि शहरीभागाला जोडणारे सर्वच रस्ते महामार्गाला जोडलेले असल्याने दिवसभर रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. अशावेळी काही ठिकाणी अचानक कोणीतरी महामार्गावर आल्याने खोळंबा होतो. त्यावर उपाय म्हणून वर्दळीच्या वळण रस्त्यावर सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. सध्या शहर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असले तरीही शहराच्या वाहतुक व्यवस्थेसाठी तो आवश्यक असल्याने सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर त्यावरुन वाहतुकीचे संचलन केले जाईल.
– भगवान मथुरे (पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर)

Visits: 9 Today: 1 Total: 30396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *