दुपारी ‘रोकड’ चोरी तर रात्री ‘गंठन’ लांबविण्याचा प्रकार! संगमनेरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थंडीची चाहूल लागताच संगमनेरातील चोर्यांच्या सत्राला सुरुवात झाली असून त्यात आता महिलांच्या गळ्यातील गंठन व रोकड लांबविण्याच्या घटनांचीही भर पडू लागली आहे. मंगळवारी अवघ्या आठ तासांत अशाच दोन घटना समोर आल्या असून दोन्ही घटना एकाच परिसरात घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत नाशिक रस्त्यावरील विद्युत उपकेंद्रासमोरील रस्त्यावरुन सहा लाखांची रोकड लांबविण्याचा तर रात्री आठच्या सुमारास वाहनाची वाट पहात उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोहे वजनाचे गंठन ओरबाडण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत धूमस्टाईल पसार होण्याच्या प्रयत्नातील दोन्ही चोरटे दुचाकीसह खाली पडल्याने त्यांनी आपले वाहन सोडून पोबारा केल्याचेही समोर आले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही घटनांनी संगमनेरात रोकड व गंठन चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्याचे स्पष्ट झाले असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातील पहिली घटना मंगळवारी (ता.9) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर महाविद्यालयाजवळील विद्युत उपकेंद्रासमोरील अकोले बायपास रस्त्यावर घडली. जागा खरेदी व विक्रीचा व्यवसाय करणारे धर्मराज बाकेराव कासार (रा.साईनगर, घुलेवाडी) हे सहा लाख रुपयांची रोकड आपल्या दुचाकी वाहनाच्या डिकीत घेवून कामानिमित्त निघाले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या वाहनाच्या डिकीतील पैशांची पिशवी अलगद काढून घेवून पोबारा केला. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होवू शकला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

याच परिसरात रात्री सव्वा आठच्या सुमारास आणखी एक घटना घडली. घुलेवाडीतील बालाजीनगर परिसरात राहणार्या रोहिणी अर्जुन गंधकते या घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पहात श्री.ओकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाजवळ उभ्या होत्या. त्याचवेळी बजाज पल्सर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी आसपास कोणी नसल्याचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे आणि सरकारी दरानुसार 45 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळण्याच्या प्रयत्न केला. या गदारोळात त्यांची दुचाकी अडखळून ते दोघेही खाली पडले. यावेळी सदर महिलेने आरडाओरड केल्याने आसपासच्या नागरिकांनी तेथे धाव घेतली.

त्यामुळे गडबडलेले दोन्ही चोरटे आपली बजाज पल्सर दुचाकी (क्र.एम.एच.05/डी.आर.6818) तेथेच सोडून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी आसपासचा परिसर पिंजून काढला, मात्र ते कोठेही मिळून आले नाहीत. या गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून ती चोरीची असल्याचे व त्यावरील क्रमांकही बनावट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन दुपारच्या घटनेतही दोन वाहनांवर संशय असून त्याबाबतची माहिती मिळविली जात आहे. एकाच दिवशी आणि एकाच परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास विधी महाविद्यालयाजवळ घडलेल्या गंठन चोरीच्या प्रकरणात चोरट्यांना दुचाकी सोडून पळावे लागले. त्यामुळे ‘त्या’ दुचाकीवरुन चोरटे सापडतील अशी अपेक्षा व्यक्त होत असताना ती फोल ठरली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या दुचाकीवरील क्रमांक उल्हासनगर येथील असला तरीही त्या वाहनाचा चेसी क्रमांक मात्र त्याच्याशी जुळणारा नसल्याने सदरची दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमागे उल्हासनगर परिसरातील इराणी टोळीचा हात असल्याचा संशय असून पोलिसांकडून त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे.

