आ.तांबेंचा ‘डबल गेम’ विखेंची गोची करण्यासाठी? कोणतेही काम मार्गी लावण्याची आपल्यात ताकद :आ.सत्यजित तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणतेही काम मार्गी लावण्याची ताकद आपल्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही मंत्र्याशी आपले चांगले संबंध आहेत. हे संबंध तुम्हालाही माहित आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेने कामाबाबत अजिबात काळजी करू नये. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाचे काम मार्गी लावण्याची क्षमता आपल्यात असल्याचे आ. सत्यजित तांबे यांनी सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गोची केल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे भोजापुरच्या पाण्याच्या श्रेय वादावरून महायुतीचे नेते मंत्री विखे पाटील आणि आ.खताळ यांच्यासोबत थोरात,तांबे या मामा भाच्याच्या वाद सुरू असतांना सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मैत्रीचा दाखला देऊन आ.तांबे नेमकं काय साध्य करू पाहताय याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री विखे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आ.तांबे हे दाखले देत आहेत का? तांबे यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्यातून पुढे आले आहेत.

तिगाव माथा येथे भोजापुर चारीच्या जल पूजनाचा कार्यक्रम झाला. तब्बल ४० वर्षानंतर या चारीला पाणी आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या उपस्थितीत या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. सुमारे दहा-पंधरा गावातील नागरिकांच्या उपस्थितीत सजवलेल्या बैलगाडीतून या दोघांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचा आनंदोत्सव सुरू असतानाच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या श्रेय वादावर विरजण टाकले.

आठ महिन्यात हे शक्य आहे का? असे म्हणत त्यांनी विखे आणि खताळ यांना आरसा दाखवला. विखेंनी या चारीत खडा सुद्धा उचलला का? नव्या आमदारांना ही चारी तरी माहीत होती का? असा सवाल करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे खताळ यांच्या श्रेयाच्या फुग्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर विखे पाटील आणि खताळांनी थोरात यांना काही प्रश्न विचारत त्यांच्या नाकर्तेपणावर चांगलाच आसुड उगारला. गेल्या आठ दिवसापासून भोजापुर चारीच्या पाणी चांगलेच तापले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात अजूनही जुगलबंदी सुरू आहे.

या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपापल्या नेत्याची पाठ राखण करतांना दिसत आहेत. चाळीस वर्षात जे जमले नाही, ते आम्ही करून दाखवलं असे महायुतीचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे थोरात यांनी केलेल्या कष्टाचे श्रेय काही जण घेत आहेत असा आरोप थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी संगमनेर खुर्द येथे विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अपक्ष आ. सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा आता सुरू झाली आहे.

या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मानवता हाच आपला धर्म आहे. संगमनेर मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते परंतु आता काही जण जातीभेद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा विघातक कृतींना आपल्याला रोखावे लागेल. समता, बंधुता व शांतता आपल्याला टिकवून ठेवावी लागेल. एकेकाळी दंगलीसाठी ओळखले जाणारे संगमनेर आज विकासासाठी व शांततेच शहर म्हणून नावारूपाला आले आहे. तीच ओळख आपल्याला कायम ठेवावी लागेल. सध्या सुरू असलेली जाती-जातीतील फुट आपल्याला रोखावी लागेल.

याच कार्यक्रमात आ.सत्यजित तांबे यांनी केलेले वक्तव्य मात्र चांगलेच चर्चेत आले. सत्यजित तांबे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादाने मला काम करण्याची संधी मिळाली. ही संधी तुम्हा सर्वांसाठी मार्गी लावली जाईल. कोणतेही काम मार्गी लावण्याची ताकद आपल्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर सर्व मंत्र्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत हे तुम्हालाही माहित आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील जनतेने अजिबात काळजी करू नये. प्रत्येकाचे प्रत्येक काम मार्गी लावले जाईल. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नागरिकाचे काम मार्गी लावण्याची क्षमता आपल्यात आहे.

आ. सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वास्तविक सत्यजित तांबे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत, हे सर्वांना माहीत आहे. सत्यजित तांबे हे भाजपात येतील अशाही चर्चा अनेकदा ऐकायला येतात. कधीकधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेही भाजपात येतील अशा अटकळी बांधल्या जातात परंतु तसे काहीच होताना सध्या तरी दिसत नाही. आता संगमनेर तालुक्यात थोरात आणि विखे या दोन्ही नेत्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. भोजापूर व निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण पेटले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांनी आपापले कार्यकर्ते ‘ॲक्टिव्ह’ केले आहेत. थोरात हे महायुतीचे मंत्री विखे पाटील, आ. अमोल खताळ यांच्यावर जोरदार टीका करतांना दिसतात. त्यातच आ. सत्यजित तांबे यांनी संगमनेर खुर्द येथील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस व तांबे यांच्यातील जवळकीची चांगलीच चर्चा सुरू झाली.

या सर्व प्रकारामुळे संगमनेर मधील मतदार ‘कन्फ्युज’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे महायुतीच्या मोठ्या नेत्यांशी मित्रत्वाचे सबंध ठेवण्याचे तर दुसरीकडे महायुतीच्या स्थानिक नेत्यांशी दोन हात करायचे अशी दुहेरी खेळी आ. तांबे करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर करून संगमनेरच्या जनतेला आश्वासित करणे व महायुतीच्या स्थानिक नेत्यांना कोंडीत पकडणे, संगमनेरच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरणार आहे. फडणवीसांशी असलेले मैत्रीपूर्ण सबंध सांगून आ. सत्यजित तांबे यांनी मंत्री विखे व आ. खताळ यांची गोची तर केली नाही ना? मंत्री विखे पाटील यांच्यावर दबाव टाकण्याचा हा आ. तांबे यांचा प्रयत्न असावा अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु या सगळ्या प्रकारानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर काही बोलतील का? की गप्प राहतील, हेही पहावे लागणार आहे. संगमनेरच्या राजकारणात नेमकं कोण कोणाचा गेम करतेय हे येत्या काळात समजणारच आहे.

एकीकडे महायुतीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यावर पकड मजबूत करत आहेत. विधानसभेला थोरात यांचा पराभव करून ४० वर्षात पहिल्यांदाच संगमनेर विधानसभेवर महायुतीने झेंडा फडकवला आहे. आता हेच महायुतीचे नेते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत असतांना आ.तांबे यांनी महायुतीचे सेनापती अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतचे संबंध जाहीर करून विखे आणि खताळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Visits: 59 Today: 2 Total: 1110151
