नववर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई! चंदनापुरीचा दारुतस्कर पकडला; गोव्याच्या दारुचे लेबल बदलून सुरु होता धंदा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
झटपट पैसा कमावण्यासाठी कोण काय करील याचा काही भरवसा नाही. असेच काहीसे सांगणारी घटना कधीकाळी वाहनचालकांना धडकी भरवणार्या जुन्या चंदनापुरी घाटातून समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर विभागाने आज केलेल्या घडक कारवाईत एका दारु तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. घटनास्थळावरील कारवाईत त्याच्याकडून 48 तर घरावर घातलेल्या छाप्यातून तब्बल दीडशेहून अधिक गोवा निर्मित दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून ताब्यात घेण्यात आलेला आरोपी राजेंद्र रहाणे राज्यात विक्रीसाठी मनाई असलेल्या मद्याच्या बाटल्यांचे बूच व लेबल बदलून त्याची विक्री करीत असल्याचेही उघड झाले आहे. त्याच्या ताब्यातून एकूण 1 लाख 76 हजार 480 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.29) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटात करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह चंदनापुरी घाटाच्या दोन्ही बाजुने नाकाबंदी करीत आरोपीला दुचाकीसह पकडले. यावेळी त्याच्या झडतीत वाहनात लपवून वाहतूक होत असलेल्या गोवा राज्यात निर्मित व महाराश्ट्रात विक्रीस मनाई असलेल्या 48 मद्याच्या बाटल्या आढळल्या.
यावेळी त्याला त्याची ओळख विचारली असता त्याने आपले नाव राजेंद्र सीताराम रहाणे (वय 45, रा.आनंदवाडी, चंदनापुरी) असल्याचे सांगितले. अधिक चौकशी कामी त्याला ताब्यात घेत पथकाने तेथून थेट आनंदवाडी गाठून त्याच्या घरावरही छापा घातला. या कारवाईत पोलिसांना आरोपीने घरात दडवून ठेवलेल्या गोवा निर्मित मद्याच्या 750 मिलीच्या 157 बाटल्या आढळल्या. त्याशिवाय वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांची बूचे व राज्यात विक्री होणार्या मद्याच्या रिकाम्या बाटल्याही उत्पादन शुल्कच्या पथकाने जप्त केल्या.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अधिकची चौकशी सुरु आहे. या कारवाईत संगमनेर विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक एम.डी.कोंडे, बी.वाय.चव्हाण, जवान ए.जी.गुंजाळ, चालक एस.एम.कासुळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर.वराट, महिला जवान वाय.एन.सोनवणे आदउींचा सहभाग होता. या कारवाईने बनावट व राज्यात मनाई असलेले गोवा व दमण येथील मद्य विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. दुय्यम निरीक्षक एम.डी.कोंडे पुढील तपास करीत आहेत.