साईनगरीच्या विविध भागांतून चार मोटारसायकलींची चोरी मोटारसायकल मालकांमध्ये घबराट तर पोलिसांपुढे शोध लावण्याचे आव्हान
नायक वृत्तसेवा, शिर्डी
आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान असलेल्या साईनगर व परिसरातून मोेटारसायकल चोर्यांचे प्रमाण वाढले असून शहरातील विविध भागातून सोमवारी (ता.4) तब्बल चार मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत. याप्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मोटारसायकल चोरणारी मोठी टोळी कार्यरत असून पोलिसांना अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यामुळे मोटारसायकल मालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शिर्डी शहरातील पहिली घटना नगरपंचायत कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये घडली आहे. सतीश बाबुराव गायके यांची पल्सर (क्र. एमएच 17 एआर 4007) मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लॉक तोडून चोरून नेली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुरनं. 320/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार माघाडे करीत आहेत.
तसेच निमगाव कोर्हाळेतील कातोरे वस्ती येथून दोन मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. त्यात 20 हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना (एमएच. 17, सीबी. 6530) आणि 10 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच. 15, बीटी. 5305) चोरीस गेल्या आहेत. या मोटारसायकली सुनील विश्वनाथ होन यांच्या घरासमोर लावलेल्या होत्या. दोन्ही मोटारसायकलचे लॉक तोडून चोरांनी त्या चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुरनं. 321/2022 प्रमाणे भादंवि कलम 379 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गंभीरे करीत आहे.
चौथी घटना श्री साईबाबा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये घडली आहे. विकास सोनवणे (श्रीरामपूर0) यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर (क्र. एमएच. 17, बीजी. 1710) ही 2 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 12 च्या सुमारास श्री साईबाबा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून चोरून नेली. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक वाळके करत आहेत. या चोर्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.