नांदूर खंदरमाळमधील शेतकर्यांच्या शेतात रोटरीचे वृक्षारोपण! केशर आंबा, वड, पिंपळ व चिंचेसह पाचशे झाडांचे केले रोपण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या संगमनेर रोटरीने सामाजिक भान जपत शेतकर्यांच्या शेतात वृक्षारोपणाचा अभिनव प्रयोग केला आहे. यावर्षी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथे केशर आंबा, वड, पिंपळ, चिंच अशा एकूण 500 झाडांचे नुकतेच वृक्षारोपण केले आहे. या झाडांना ठिबकद्वारे पाणी मिळत राहील अशी व्यवस्थाही केली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास व ऑक्सिजन निर्मिती होण्यास मोठी मदत मिळणार आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख दीपक मणियार व रवी पवार यांनी दिली आहे.

गेली अनेक वर्षांपासून संगमनेर रोटरी वृक्षारोपणाचे सामाजिक काम करीत आहे. परंतु झालेल्या वृक्षारोपणाच्या संवर्धनाचा प्रश्न समोर येऊ लागला. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षीपासून शेतकर्याच्या शेतात हे वृक्ष लावण्यात यावे जेणेकरुन शेतकरी व रोटरी मित्र या झाडांचे संगोपन काळजीपूर्वक करतील असा विचार घेऊन हे वृक्षारोपण करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 250 केशर आंब्याची रोपे डोळासणे येथील शेतकरी रत्नाकर पोखरकर यांच्या शेतात लावण्यात आले. आज 1 वर्षानंतर ही झाडे अतिशय सुंदर वाढली असून पुढील वर्षी याला फळ येणे सुरू होणार आहे. याप्रकारे वृक्षारोपणामुळे रोटरीकडे या परिसरातील 10 शेतकर्यांनी आमच्या शेतात हा प्रकल्प राबवावा अशी मागणी केली होती. यामधून नांदूर खंदरमाळ येथील मुरलीधर गणपत तावरे यांच्या शेतावर 200 केशर आंबा व पर्यावरणपूरक इतर 50 व खंदरमाळवडी येथील काशिनाथ शिरोळे यांच्या शेतावर 200 केशर आंबा व पर्यावरणपूरक इतर 50 झाडांची रोपे नुकतीच लावण्यात आली अशी माहिती रोटरी संगमनेरचे अध्यक्ष योगेश गाडे व सचिव हृषीकेश मोंढे यांनी दिली.

प्रारंभी सर्व रोटरी सदस्यांचे तावरे व शिरोळे कुटुंबियांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक रोटरी सदस्यांच्या हस्ते एका रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तावरे व शिरोळे कुटुंबियांचे झाडे लावण्यासाठी बागायती शेती उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानण्यात आले. तसेच सदर झाडांची जपवणूक करण्याची ग्वाही कुटुंबियांनी दिली. यावेळी दिलीप मालपाणी, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, रोटरी आय केअरचे अध्यक्ष नरेंद्र चांडक, पवनकुमार वर्मा, डॉ. विकास करंजेकर, रवीकांत ढेरंगे, संजय कर्पे, सुनील कडलग, ओंकार सोमाणी, सुनील घुले, डॉ. प्रमोद राजूस्कर, मधुसूदन करवा, बाळू इंदाणी, बाळू मणियार, डॉ. योगेश गेठे, रवींद्र पवार, धर्मेंद्र निहलाणी, डॉ. किशोर पोखरकर, आनंद हासे, डॉ. सागर गोपाळे, विश्वनाथ मालाणी, शरद तुपविहरे, गोरख कर्पे, पवन धाडीवाल, अण्णा शेलकर आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.
