राजूरला सलग चार दिवस डांगी जनावरांचे प्रदर्शन कोट्यवधीची होणार उलाढाल; शेतकरी झाले आशावादी


नायक वृत्तसेवा, राजूर
दरवर्षी डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भरविण्यात येणारे डांगी, देशी-विदेशी जनावरे व कृषी मालाचे प्रदर्शन यंदा ३०, ३१ डिसेंबर व १ व २ जानेवारी असे सलग चार दिवस आयोजित करण्यात आल्याची माहिती राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांनी दिली.

सलग ४ वर्षे राजूर (ता.अकोले) येथील हे प्रदर्शन बंद असल्याने शेतकर्‍यांच्या सर्जा-राजाच्या खरेदी-विक्री बरोबरच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी-विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो शेतकरी जनावरांची खरेदी-विक्री करतात तर काही जनावरे प्रदर्शनासाठी आणत असतात.

अहमदनगर, नाशिक, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद आदी ठिकाणांहून जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात. सलग चार दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत असतात. विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात. या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मागील तीन वर्षे कोरोनाच्या व एक वर्ष लम्पी प्रादुर्भावामुळे हे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. यावर्षी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असल्याने प्रदर्शन भरणार म्हटल्यावर शेतकरी आशावादी झाले आहेत. सलग चार दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत डांगी जनावरांची निवड व बक्षीस वितरण होणार आहे. तर हे प्रदर्शन सुरळीत पार पाडण्यासाठी सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, ज्येष्ठ सदस्य गोकुळ कानकाटे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *