निमजमध्ये अकरा वर्षांपासून दरवळतोय झेंडूचा सुगंध! प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांचा तरुणांसाठी आदर्श..

महेश पगारे, संगमनेर
तालुक्यातील निमज येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ हे सलग अकरा वर्षांपासून झेंडूची लागवड करुन भरघोस उत्पन्न मिळवत आहे. तब्बल बारा एकरावर ते आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करुन लागवड करतात. याची अनेक शेती अभ्यासकांसह माध्यमांनी देखील दखल घेतलेली आहे. एकाच पिकात सातत्य ठेवूनही त्यात यशस्वी होण्याचा कित्ता गिरविल्याने सध्याच्या परिस्थितीत इतर शेतकर्‍यांसाठी नवा आदर्श ठरत आहे.

प्रवराकाठच्या गावांना भाजीपाला व ऊस पिकाचे आगार म्हणून ओळखले जाते. ही ओळख निर्माण करण्यात येथील अनेक शेतकर्‍यांची अपार मेहनत आहे. यातील निमज येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांनी तरुण शेतकर्‍यांना नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे नोकरीच्या मागे धावणार्‍या तरुणांना तुकाराम गुंजाळ यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने करत असलेल्या शेतीचा आदर्श दाखवून दिला आहे. शेतीला आत्मविश्वास, कष्ट, जिद्द आणि तंत्रज्ञानाची भक्कम जोड असली तर कधीच अपयश वाट्याला येणार नाही यावर त्यांचा दृढ विश्वास असून प्रत्यक्षात त्यांनी दाखवूनही दिले आहे.

मे महिन्याच्या अखेरीस एकाचवेळी बारा एकरवर झेंडूची लागवड केली. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून शेणखत व कोंबड खत टाकले आणि मल्चिंग पेपरचा वापर केला. यासाठी प्रतिएकर साधारण 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च आला आहे. आत्तापर्यंत बारा तोडे झाले असून, 8 टनाच्या आसपास उत्पादन निघाले असून 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सरासरी 20 ते 50 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले आहे. अद्यापही काढणी सुरूच असून 20 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करण्यात गुंजाळ परिवाराचा हातखंडा झाल्याने ते एकाच बेडवर टोमॅटो, दोडका व झेंडू ही तीन पिके यशस्वीरित्या काढण्याचा जणू पायंडाच पाडला आहे. नैसर्गिक संकटे आली तरी त्याच्याशी दोन हात करत यशस्वी होण्याचा विक्रमच प्रस्थापित केला आहे.

पिकांचा फेरपालट, जमिनीतील सेंद्रीय कर्बाकडे विशेष लक्ष देवून केलेलं नियोजन व एकात्मिक शेती व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ हे शेतीतून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. आत्मसात केलेले तंत्रज्ञान केवळ स्वत:पुरते मर्यादित न ठेवता राज्यातील शेतकर्‍यांना देखील मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. कृषी विभागाने त्यांचा समावेश राज्यस्तरीय शेतकरी रिसोर्स बँकेत केला असून राज्यातील व राज्याबाहेरील शेतकरी त्यांचे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी व समजावून घेण्यासाठी येतात.
– सुधाकर बोराळे (उपविभागीय कृषी अधिकारी)

प्रयोगशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांनी तरुण शेतकर्‍यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. याचबरोबर शेतीत सातत्याने झेंडू पीक घेऊनही यशस्वी झाले आहे. याचे इतर शेतकर्‍यांनी अनुकरण करावे.
– वीरेंद्र थोरात (संचालक विश्व हायटेक नर्सरी-वीरगाव)

Visits: 16 Today: 1 Total: 116394

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *