मनसे उपशहर प्रमुखाचा काँग्रेसमध्ये प्रवेश! … तर नगर शहरात काँग्रेसचा आमदार होईल ः थोरात

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यात सध्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार्‍यांचा ओढा दिसून येत आहे. अहमदनगरमध्ये मात्र, विविध पदाधिकार्‍यांचे काँग्रेस प्रवेश सुरू आहेत. मनसेचे उपशहर प्रमुख अभिनय गायकवाड यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा धागा पकडून थोरात म्हणाले की, ‘अशीच पक्ष बांधणी सुरू राहिली तर नगर शहरात काँग्रेसचा आमदार होईल.’ सध्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आमदार आहेत. अशा परिस्थतीत थोरात यांचे हे वक्तव्य लक्षवेधक ठरत आहे.

अहमदनगर शहरातील विविध पक्षातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातील मीरपूर येथील कार्यक्रमात थोरात यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे माजी उपशहरप्रमुख अभिनय गायकवाड, माळीवाडा भागातील ज्योती उमेश साठे, दीपक जपकर, सावेडीतील सुजित क्षेत्रे यांनी आपल्या सहकार्‍यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ‘नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम संघटनात्मक बांधणी सुरू आहे. सातत्याने पक्षप्रवेश सुरू आहेत. काळे यांनी शहरात नव्या दमाची चांगली टीम उभी केली आहे. शहरातील विविध घटक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जात असतात. अशाच पद्धतीने समाजाचे काम त्यांनी सतत सुरू ठेवले आणि संघटनात्मक बांधणी शहरात सातत्याने सुरू राहिली तर काळे नक्की काँग्रेसच्या माध्यमातून शहराचे आमदार होतील.’

किरण काळे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीमध्ये सर्वात मागासलेला मतदारसंघ आहे. आजही असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. संगमनेरमध्ये नगरपरिषद असून देखील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विकासात्मक व्हिजनमधून विकासाचे चांगले मॉडेल संगमनेरमध्ये राबविले गेले आहे. नगर शहरामध्ये देखील संगमनेरच्या धर्तीवर विकासाचे मॉडेल राबवण्याची गरज आहे. आगामी काळात महानगरपालिकेत सत्ता मिळवत शहर काँग्रेस विकासाच्या संगमनेर मॉडेलची अंमलबजावणी नगर शहरामध्ये निश्चितपणे करेल.’ मनसेचे उपशहर प्रमुख असणार्‍या अभिनय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रवेश केला आहे.

Visits: 29 Today: 2 Total: 219319

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *