स्वयंघोषित पुढार्‍याकडून प्रसिद्धीसाठी खोटे आरोप ः खेमनर पठारभागातील जनता निषेध करत असल्याचेही केले स्पष्ट


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. साकूर व पठार भागामध्ये आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची कामे करतो. हे काही लोकांना पाहवत नसून निवडणुकीत आलेले अपयश म्हणून फक्त राजकीय द्वेषातून या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने खोटेनाटे आरोप केले आहेत. राजकीय दबाव टाकून खोटे गुन्हे नोंदवले आहेत. अशा राजकीय दबावाला सूज्ञ साकूरकर घाबरणार नसून या विकृत राजकारणाचे पठारभागातील जनता पूर्णपणे निषेध करत असल्याची टीका सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांनी केली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खेमनर म्हणाले की, 29 डिसेंबर रोजी स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे याने जोगेपठार येथे राहणार्‍या ठाकर समाजातील वस्तीवर जाऊन काही मुली व महिला यांचे चुकीचे फोटो काढले व व्हिडिओ बनवला. याबाबत गावातही अत्यंत असभ्य भाषेत गावकर्‍यांशी वर्तन केले. रफीक चौगुले हे शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार असून त्यांच्यावरही इघेचा राग आहे. विशेष म्हणजे जोगेपठार येथील वस्तीकरीता रफीक सिकंदर चौगुले यांनी आपल्या शेततळ्यातून सहा वर्षांपासून पाणी दिले आहे. याचबरोबर या गावासाठी एक गुंठा जागाही विहिरीसाठी दिली आहे. याबद्दल सर्व जोगेपठार व ग्रामस्थ यांचे चौगुले यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.

मात्र निवडणुकीत आलेल्या अपयशातून इघे याने राजकीय प्रसिद्धीसाठी ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, सरपंच, शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर व रफीक चौगुले यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप केले. याप्रसंगी इघे याच्याविरुद्ध या भागात राहणार्‍या समाजानेही आवाज उठवला. इघे तुझा येथे काही संबंध नाही, तू खोटी माहिती देऊ नको. बोगस तक्रारी करू नको. विनाकारण बदनामी करू नको असे या ग्रामस्थांनी त्याला सांगितले. यावेळी जनता आपल्याबरोबर नाही हे पाहून त्याने गोंधळ घालण्याचा प्रकार केला. याचबरोबर अत्यंत असभ्य भाषेत त्यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकार्‍यांशी अरेरावी केली. जनतेचा पाठिंबा नाही याचा मनात राग ठेवून आपल्याला राजकीय पाठबळ मिळावे या कारणाने पोलीस ठाण्यात जाऊन चुकीची माहिती देत शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, रफीक चौगुले, ग्रामसेवक व इतर 20 ते 25 जणांचे खोट्या तक्रारीमध्ये नावे नोंदवली. यामध्ये या लोकांचा अक्षरशः काहीही संबंध नव्हता. फक्त स्वतःची प्रसिद्धी व्हावी व आपल्याला विरोधकांचे पाठबळ मिळावे या उद्देशाने त्यांनी हा उद्योग केला आहे. हे राजकीय षडयंत्रातून झाले आहे. मात्र अशा दबावाला साकूरची जनता कधीही बळी पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

साकूर व पठाराचा पाठिंबा!
बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर व रफीक चौगुले यांच्यासह विविध कार्यकर्त्यांवर केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ साकूर गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता. या बंदमधून शंकर खेमनर यांच्या विचारांना जनतेचे समर्थन असून हा स्वयंघोषित पुढारी मात्र उघडा पडला असल्याची टीका रफीक चौगुले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *