दरेकरांनी राज्य व केंद्राच्या मोजमापाचाच आढावा घेतला ः मापारी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठ्या थाटात जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थितीचा आढावा घेण्याचा आव आणला. प्रत्यक्षात त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या मोजमापाचा आढावा घेतला असल्याची टीका जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी केली आहे.
राज्यात व जिल्ह्यात कोरोनोची परिस्थिती अतिशय भयावह आहे. अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. अनेक संसार उध्वस्त झाले असताना राज्यात प्रवीण दरेकर हे सभागृहाचे जबाबदार प्रतिनिधी आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली मग या बैठकीत ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटीलेटरबाबत काय योगदान दिले. मग ही आढावा बैठक फक्त राज्य व केंद्र सरकारच्या मोजमापासाठी घेतली होती असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात सारख्या राज्यात भाजपचे सरकार आहे. तेथे कोरोनोची परिस्थिती मोठी चिंतेची बाब आहे. याकडे दुर्लक्ष करुन देशातील पाच राज्यातील निवडणुकांचा रणसंग्राम करुन देशात अराजकता माजविण्याचा मोठा प्रयत्न केंद्रातील भाजपने केला. सर्वोच्य न्यायालय, उच्च न्यायालय केंद्रातील भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढत असताना त्याच केंद्र सरकारविषयी दरेकर जिल्ह्यात येवून मोठ्या वल्गना करताहेत हे अशोभनीय आहे. सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेसह प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यानिहाय प्रशासकीय अधिकार्यांसमवेत बैठका घेऊन कोरोनो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. भाजप आमदार व त्यांच्या पदाधिकार्यांकडून कोरोनो काळात राजकारण करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत वर्ग केली हे राज्यातील जनतेला ज्ञात आहे. अशा लोकांना खरचं महाराष्ट्र राज्यातील बारा कोटी जनता कधीचं माफ करणार नाही. भाजपची राज्यात अवस्था ‘सल्ला राज्याला व गल्ला केंद्राला’ अशी झाली असल्याची टीकाही मापारी यांनी केली आहे.