‘अशा’ कर्मचार्यांचा ‘अहंम’ तोडण्यात आपला हातखंडा! विश्रामगृहाची खासगी खाणावळ; कार्यकारी अभियंत्यांकडून संगमनेरच्या पत्रकारांचे कौतुक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासकीय सेवेत असलेल्या स्वयंपाक्याने बेकायदा पद्धतीने शासकीय संसाधनांचा वापर करुन चक्क संगमनेरच्या विश्रामगृहातच खासगी खाणावळ सुरु केली. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी पगार आणि सवलतींचा परिपूर्ण लाभ घेत, आपल्या हातच्या चवीतून त्याने काही राजकीय मंडळी व उच्चपदस्थ अधिकार्यांची ‘वाहवा’ मिळवल्याने काही दिवसांपासून ‘तो’ फुगलेल्या बेडकासारखा वागू लागला होता. या प्रकाराबाबत संगमनेरातील पत्रकारांनी त्या विरोधात आवाज उठविल्यानंतर शासकीय विश्रामगृहाला आपली खासगी मालमत्ता समजणार्या रवी खरपुडे या चतुर्थश्रेणी कर्मचार्याला (खानसामा) सध्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्याच्यावरील कारवाईची माहिती घेण्यासाठी गुरुवारी पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली असता त्यांनी शहरातील पत्रकारांचे कौतुक करीत ‘अशा’ कर्मचार्यांचा ‘अहंम’ तोडण्यात आपला हातखंडा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या खानसामाला शेवटपर्यंत आठवणीत राहील अशी शिक्षा सुनावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या शासकीय विश्रामगृहांमध्ये गणना होणार्या संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात गेल्या अनेक वर्षांपासून रवी खरपुडे नावाचा चतुर्थश्रेणी कर्मचारी खानसामा (स्वयंपाकी) म्हणून कार्यरत आहे. विश्रामगृहात निवासासाठी येणार्यांसह तालुक्यात शासकीय कमकाजासाठी येणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या खानपानाची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्ह्यातील अहमदनगर, शिर्डी व संगमनेर येथील विश्रामगृहांमध्ये ‘अशा’ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील संगमनेर व शिर्डी येथील विश्रामगृहावर नेहमीच राजकीय नेते, वरीष्ठ शासकीय अधिकारी यांची रेलचेल असते. अशावेळी संबंधितांना खानपान सेवा देताना अशा कर्मचार्यांचा थेट या मंडळींशी संवाद होत असल्याने त्यातून त्यांच्या ओळखी वाढतात आणि कालांतराने त्याचा परिपाक ‘त्या’ कर्मचार्यांमध्ये फाजील आत्मविश्वास वाढीस लागून ते बैलाप्रमाणे शरीर फुगवणार्या बेडकासारखे होतात.
असाच अनुभव सध्या संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात अनुभवायला मिळत असून राजकीय नेते, अधिकारी यांच्या शाब्बासकीच्या शब्दांनी बेडकासारख्या फुगलेल्या रवी खरपुडे या खानसामाने शासकीय नियमांच्या आईचा घोऽ करीत गेल्या अनेक वर्षांपासून शासन, प्रशासन अथवा विश्रामगृहाशी काही एक संबंध नसलेल्यांचीही खासगी सेवा सुरु केली. विशेष म्हणजे या महाशयांनी आपल्या खासगी ‘धंद्या’साठी शासकीय इमारत, तेथील लाईट, पाणी, टेबल व खुर्च्या यासह पंखे, वातानुकुलित यंत्रणा आणि कधीकधी बिगर नोंदणी करताही निवासी खोल्यांचा सर्रास मनमानी वापर सुरु केला. राजकीय व्यक्ती आणि अधिकार्यांशी थेट व्यक्तीगत ओळखी असल्याने त्याच्या या कृत्यांना गेली अनेक वर्ष विरोध करण्यास कोणीही धजावले नाही. मात्र सदरचा प्रकार संगमनेर पत्रकार संघाच्या बैठकीदरम्यान सदस्यांना समजताच या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला.
त्या अनुषंगाने गुरुवारी (ता.11) श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जावून सरकारी मालमत्तेचा अशा पद्धतीने दीर्घकाळ दुरुपयोग करणार्या या कर्मचार्यांवर कठोर कारवाई आणि त्याने शासकीय संसाधनांचा परिपूर्ण वापर करुन कमावलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यासह त्याच्याकडून वापरापोटीची नुकसान भरपाई करुन घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांनी पत्रकारांच्या भूमिकेचे स्वागत केले. अशाप्रकारे कोणताही कर्मचारी शासकीय संसाधनांचा वापर करीत असेल तर ही बाब अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची आपण यापूर्वीच दखल घेवून रवी खरपुडे या कर्मचार्याला सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे ते म्हणाले.
पत्रकारांशी आजच्या संवादातून ‘त्या’ कर्मचार्याच्या संपूर्ण प्रकरणावर अधिक प्रकाश पडल्याने त्याच्याकडून शासकीय मालमत्तेचा कसा दुरुपयोग होतोय याची वस्तुस्थिती लक्षात आल्याचे सांगत वरीष्ठांच्या शाब्बासकीच्या शब्दाने फुगलेल्या ‘अशा’ कर्मचार्यांचा ‘अहंम’ तोडण्यात आपला विशेष हातखंडा आहे. यापूर्वी शिर्डीतील अशाच एका ‘खानसामा’वर केलेल्या कारवाईचा दाखलाही त्यांनी दिला. संबंधित कर्मचार्याला नोटीस बजावणार आहोत, पत्रकारांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी होईल व संबंधित कर्मचार्याला शेवटपर्यंत आठवणीत राहील अशी कारवाई आपण करणार असल्याची ग्वाही कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन ओझा, उपाध्यक्ष सतीष आहिरे, कोषाध्यक्ष नीलिमा घाडगे, सचिव सुनील महाले, श्याम तिवारी, गोरक्षनाथ मदने, आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, संजय आहिरे, अमोल मतकर, मंगेश सालपे, संदीप वाकचौरे व भारत रेघाटे आदी उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांसोबत संवाद साधतांना कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांनी ‘खानसामा’ आणि त्यांचे ‘कारनामे’ याबाबत सविस्तर आणि गंमतीशिर माहिती सांगितली. या दरम्यान चर्चेतून समोर आलेल्या मुद्द्यांवर शक्य होते त्यावर तत्काळ आणि प्रक्रिया असलेल्या विषयांची नोंद करीत त्यांनी आपली कार्यप्रवणताही दाखवली. सीसीटीव्ही कॅमेरा असूनही कर्मचारी चालाखीने कसा तो दाराआड लपवतात याबाबत पत्रकारांच्या तोंडातून किस्से ऐकताच त्यांनी उपअभियंत्यांना संपूर्ण विश्रामगृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह तीन महिन्यांचा ‘बॅकअप’ असलेला ‘डीव्हीआर’ तत्काळ बसवण्याचे आदेश दिले. लवकरच या विश्रामगृहाची व्यवस्था ‘बीव्हीजी’ समूहाकडे देणार असल्याचे सांगत ‘खानसामा’ प्रकरण आपण गांभीर्याने घेतले असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.