संगमनेर नाका ते नाशिक रस्त्याचे निकृष्ट काम सिन्नर संघर्ष समितीसह शिवसेनेचे सोमवारपासून उपोषण सुरू
नायक वृत्तसेवा, सिन्नर
येथील संगमनेर नाका ते नाशिक या निकृष्ट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कारवाई करावी. यासाठी शिवसेनेचे सिन्नर तालुकाप्रमुख शरद शिंदे यांच्यासह सहकार्यांनी उपोषण सुरू केले आहे.
सिन्नर संघर्ष समिती व शिवसेना पक्षाने सोमवारपासून (ता.४) सकाळी १० वाजता उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या तिसर्या दिवशी बुधवारी उपोषणकर्त्यांनी घंटानाद करत भ्रष्टाचाराचा निषेध केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी उपोषणस्थळी भ्रष्टाचाराची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते शरद शिंदे आणि सहकार्यांनी दिली.
याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदने पाठविण्यात आली आहेत. त्यात म्हटले आहे, की सिन्नर बसस्थानक ते एलएनटी फाटा (नासिक हायवे) व माळेगाव एमआयडीसी रस्ता कामाच्या तीन महिन्यांपासून तक्रारी येत आहेत. सदर कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा योग्यरित्या वापर न करता सदर रस्ता दोन महिन्यात एकदा नव्हे चार-पाच वेळा दुरुस्त केला गेला असला तरी कामाचा दर्जा ठेवला गेला नाही. व्यवस्थित काम न झाल्याने रस्त्याचे पोपडे निघत असून, रस्ता अनेक ठिकाणी खडबडीत आहे.
अत्यंत रहदारी असणार्या या रस्त्याचे थातूरमातूर काम केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदर कामासाठी किती निधी खर्च केला? एकदाच व्यवस्थित काम का केले नाही? हा पैसा कुठे गेला? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी रीतसर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शरद शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी ताठे, उपतालुकाप्रमुख गोपाल गायकर, शहराध्यक्ष संदीप लोंढे, उपतालुकाप्रमुख जालिंदर लोंढे, गटप्रमुख शिवाजी गुंजाळ, उपतालुकाप्रमुख गणेश जाधव, गणप्रमुख सुरेश सानप, राम शिंदे, अर्जुन घोरपडे, हेमंत काकाड, वसंत सहाणे, पुंजाराम हारक, कचरु कुंदे, सुकदेव शिंदे, विष्णू कुंदे, मच्छिंद्र खेताडे, रमेश शेळके, सुरेश दळवी, प्रकाश थोरात, अनिल गवांदे, दीपक पगार, चिंधू गुंजाळ, निलेश चव्हाण, रमेश लाड, रतन जाधव, राहुल रुपवते आदिंनी केली आहे.